नववधुसाठी आणलेले दागिने व रोकड लग्नसोहळ्यातून चोरीला

0
53

सावेडी उपनगरातील मंगल कार्यालयातील घटना

नगर – मुलीला लग्नात देण्यासाठी सासूने केलेले सोन्याचे गंठण, मंगळसूत्र तसेच रोकड असा ५८ हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास सावेडी उपनगरातील बंधन लॉन्स येथे ही घटना घडली. याप्रकरणी मुलीचे वडिल नगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम मुरलीधर तुपे (वय ५७ रा. संजोग हॉटेलच्या मागे, सावेडी) यांनी सोमवारी (दि. १८) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी बंधन लॉन्स येथे ठकाराम तुपे यांची मुलगी श्रध्दा हिचा विवाह माजलगाव (जि. बीड) येथील मुलाशी होता. विवाहातील सर्व विधी पार पाडत असताना मुलीची सासू महानंदा संदीपान लेंडाळ यांनी मुलीला लग्नात देण्याकरीता केलेले ११ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, २.४१ ग्रॅमचे मंगळसूत्र व लग्नातआलेले आहेराचे सर्व पैशाचे पाकिट एका पर्स मध्ये ठेवले होते.

दरम्यान विवाहातील सर्व विधी पार पाडल्यानंतर महानंदा लेंडाळ या वधु-वर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेल्या असता त्यांनी पर्स जवळच ठेवली होती. त्याच दरम्यान चोरट्यांनी पर्स लंपास केली. काही वेळाने फोटो काढून झाल्यानंतर महानंदा लेंडाळ या पर्स घेण्यासाठी गेल्या असता त्यांना पर्स दिसली नाही. पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समधील गंठण, मंगळसूत्र व १५ हजाराची रोकड असा ५८ हजाराचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.