नगर शहरामधील कत्तलखान्यांचे वाळकी कनेक्शन पुन्हा झाले उघड

0
60

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची पोलिसांनी केली सुटका

नगर – राज्यात गोमांसवर बंदी असली तरी नगर शहरात सर्रासपणे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरु असून, या कत्तलखान्यांसाठी ग्रामीण भागातून जनावरे पुरविली जात असल्याचे वारंवार आढळून आलेले आहे. नगरमधील कत्तलखान्यांचे नगर तालुयातील वाळकी गावाशी असलेले कनेशनही अनेकदा उघड होत आहे. पुन्हा एकदा वाळकी गावात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची नगर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत सुटका केलेली सर्व लहान मोठी जनावरे ही देशी जातीची असल्याचे समोर आले आहे.

वाळकी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पुढील बाजूस एका घराच्या आडोशाला असलेल्या संरक्षक भिंत बांधलेल्या मोकळ्या गोठ्यात देशी जातीची गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी कत्तलखान्यात नेण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली आहेत, असा एका व्येीचा निनावी फोन शनिवारी (दि.१६) रात्री ११ च्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला गेला. नियंत्रण कक्षातील पोहेकाँ. आबनावे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार पो.हे.काँ. एस. एस. सरोदे यांना याबाबत माहिती दिली.

ही माहिती स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांना कळविण्यात आली. त्यांनी रात्र गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक चव्हाण यांनी लगेच स.फौ.बी.ए. गुंजाळ, पो.कॉ. संभाजी बोराडे, चालक पो.कॉ. गोरे यांच्यासह वाळकी गाव गाठले. वाळकी गावच्या शिवारात बी.एस.एन.एल.च्या कंपाऊंडच्या भिंतीच्या कडेला असलेल्या मुनाफ पटेल (रा. झेंडीगेट, नगर) याच्या मालकीच्या मोकळ्या जागेत जावून पाहिले असता तेथे चार गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा पद्धतीने बांधुन ठेवुन त्यांना पुरेसे अन्न, पाणी व निवारा न देता त्यांची उपासमार होईल अशा स्थितीत मिळुन आली. पोलिसांनी या जनावरांची सुटका करत जागामालक मुनाफ पटेल (रा. झेंडीगेट, नगर) याच्याविरुद्ध पो.कॉ. संभाजी बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.