जेलीफिश नव्हे, डिटेक्टीव्ह रोबो!

0
64

विज्ञानाने आपल्या चमत्कारांनी नेहमीच माणसाला थक्क केले आहे. क्लोनिंग असो किंवा चालता-बोलता रोबो असो, सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने हे चमत्कारच आहेत. आता अमेरिकेत व्हर्जिनियामधील एका विद्यार्थ्याने रोबो जेली फिश तयार केला आहे. हा मासा समुद्रात हेरगिरी किंवा देखरेखीचे काम करू शकतो. सायरो नावाचा हा जेली फिश समुद्रातील हालचालींवर नजर ठेवेल. तसेच लाटा, समुद्रातील घडामोडी यांबाबतची माहितीही या रोबोकडून मिळू शकते. अमेरिकेतील प्रशासनाने या विद्यार्थ्याला अशा संशोधनाबाबत 50 लाख डॉलर्स दिले आहेत. अमेरिकन नौदलाने यापूर्वीही अशा प्रकारची जेलीफिश तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. गेल्या वर्षी नौदलाकडून जो जेली फिश बनवण्यात आला होता त्याचा आकार तळहाताइका होता. आता या विद्यार्थ्याने बनवलेला जेली फिश पाच फूट सात इंच रुंदीचा असून त्याचे वजन 170 पौंड आहे. सायरोला ऍल्युमिनियमचे आठ हात असून तिचा पृष्ठभाग सफेद रंगाचा व अतिशय लवचिक अशा सिलीकॉनचा आहे. या रोबोचे रूप खर्‍या जेलीफिशसारखेच आहे. त्याच्या आता एक ब्रेन बॉक्स असून तो मेंदूसारखा काम करतो. पाण्यात सोडताना या रोबोचे प्रोग्रामिंग केले जाते. पाण्यात हा रोबो आदेशानुसार काम करतो. या रोबोमधील त्रुटी म्हणजे त्याची निकेल हायड्राईड बॅटरी. ही बॅटरी केवळ चार तासच काम करते!