बांबूचे नूडल्स

0
27

बांबूचा उपयोग इमारत बांधण्यासाठी तसेच कागद बनवण्यासारख्या अन्य कामांसाठी होतो हे आपल्याला माहित आहे. अनेक ठिकाणी कोवळ्या बांबूच्या पोकळीत भात भरून आपल्याकडील साखरभातासारखा गोड भातही केला जातो. मात्र बांबूपासून कुणी नूडल्स आणि पापड तयार केलेले आपल्या ऐकिवात नसेल. बांबूच्या उपयोगांबाबत सातत्याने संशोधन करीत असलेल्या हिमालय जैवसंपदा संस्थेने आता बांबूपासून असे अनेक खाद्यपदार्थ तयार केले आहेत. हे पदार्थ केवळ स्वादिष्टच आहेत असे नव्हे तर त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरसारखे गुणही आहेत. जुन्या जमान्यात दक्षिण अमेरिकेतील लोकांना शेंगदाण्यांचे विविध उपयोग सांगण्यासाठी प्रख्यात कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी स्वतः शेंगदाण्यापासून ‘कोंबडी’ व अन्य पदार्थ बनवून दाखवले होते. आता भारतातील या संशोधकांनी बांबूपासून नूडल्स, कँडी व पापड बनवले आहेत. बांबूपासून कोळसा तयार करण्याचेही तंत्र यांनी विकसित केले आहे. या संस्थेने बांबूच्या अनेक नव्या प्रजातीही विकसित केल्या आहेत. संस्थेचे बांबूचे एक खास संग्रहालयही आहे. त्यामध्ये दरवाजापासून फरशीपर्यंत बांबूपासून तयार केलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या संशोधकांच्या मते बांबूपासून कापड, टाईल्स, शाम्पू वगैरे अनेक वस्तू तयार करता येतात.