टाळा मोह अतिरिक्त परताव्याचा

0
135

कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना मिस सेलिंगच्या जाळ्यात अडकण्यापासून सावध राहिले पाहिजे. यामुळे कदाचित आपले नुकसान होऊ शकते. जादा परताव्याच्या आमिषाला भरीस न पडता आपली गुंतवणूक अधिकाधिक सुरक्षित कशी राहिल,याचा विचार करायला हवा. अनेकदा अधिक परतावा मिळवण्याची इच्छा महागात पडू शकते आणि पैशावर पाणी सोडावे लागते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी चांगली पडताळणी करणे गरजेचे आहे. कोणत्या कंपनीतून किती फायदा होणार आहे, याचे आकलन करायला हवे. यासाठी आपण आर्थिक सल्लागाराची देखील मदत घेऊ शकता. अनेकदा तर लाभांशाचे आमिष दाखविले जाते. चांगल्या परतावा मिळत असल्याचे सांगून यूलिपची विक्री केली जाते. एवढेच नाही तर बँकेप्रमाणे जोखीममुक्तीचा हवाला दिला जातो. मात्र अशा फसवेगिरीपासून दूर राहणे गरजेचे आहे. सजगता बाळगूनच गुंतवणूक करावी, जेणेकरून आपला पैसा सुरक्षित राहिल.

कोणत्याही म्युच्युअल फंड, पॉलिसी किंवा कंपनीत गुंतवणूक करताना अधिक परताव्याला बळी पडू नये. अर्थात काही जण जादा परताव्याची हमी देतात, मात्र अशा गुंतवणूकीपासून सावध राहवे. अन्यथा पैसा बुडालाच म्हणून समजा. त्यामुळे विचारपूर्वकच गुंतवणूक करायला हवी. म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकीवर गॅरेटेंड रिटर्न मिळेल, विमा पॉलिसीत आपण सध्याचे आजारपण लपवू शकता अशा प्रकारचा कोणी बाता मारत असेल तर आपल्यासमवेत मिस-सेलिंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समजा. अनेकदा माहितीच्या अभावी आपण मिस सेलिंगला बळी पडतो. यापासून कसे सावध राहवे, यासाठी इथे काही टिप्स सांगता येतील.

मिस सेलिंग म्हणजे काय? – मिस सेलिंगमध्ये खोटेपणाचा आधार घेत फंडची विक्री केली जाते. या माध्यमातून जाणीवपूर्वक चुकीचे फंड विकणे, फंडची चुकीची माहिती देणे, फंड विकण्यासाठी खोटेनाटे आश्‍वासन देणे, म्युच्युअल फंडच्या ठिकाणी यूलीप विकणे, फंडबाबत अर्धवट माहिती देणे, फंडचे नियम आणि अटी अचूक न सांगणे, परताव्याचा आकडा फुगवून सांगणे आदी गोष्टींचा मिस-सेलिंगमध्ये समाविष्ट असतो.

अशी होते मिस-सेलिंग – आपल्याला लाभांशाचे आमिष दाखविले जाते. चांगल्या परताव्यासाठी यूलिपची विक्री होते. बँकेप्रमाणे जोखीममुक्त परताव्याची हमी दिली जाते. त्याचबरोबर प्रॉडक्टची पूर्वाश्रमीची कामगिरी सांगितली जात नाही आणि दिली तरी ती खरी असेलच असे नाही. जादा ब्रोकरेजसाठी खोटीनाटे सांगितले जाते. फिक्स्ड मॅच्यूरिटी प्लॅन हा मुदत ठेवीप्रमाणेच असल्याचे सांगून आपल्या माथी तो प्लॅन मारला जातो. याप्रमाणे ग्राहकासमवेत मिस सेलिंग होते.

लाभांशाचे आमिष – म्युच्युअल फंडमध्ये लाभांशाला काही अर्थ नसतो. लाभांशाच्या माध्यमातून आपलाच पैसा परत दिला जातो. मात्र गुंतवणूकदारांना अशा योजनेतील बारकावे ठाऊक नसल्याचे लाभांशाचा वापर हा मिस सेलिंगसाठी केला जातो.

चांगल्या परताव्यासाठी युलिप – कोणत्याही यूलिपमध्ये हमखास परतावा मिळत नाही. जीवन विम्याला देखील परताव्यासाठी कोणताही पर्याय नसतो. गुंतवणुकीच्या हिशोबाने यूलिप योग्य गुंतवणूक नाही. चांगल्या परताव्यासाठी यूलिप खरेदी करु नये. बाजारातील गुंतवणूकीवर अवलंबून असलेल्या योजनेवर परताव्याची हमी कोणीही देत नाही. म्युच्युअल फंड ही बाजाराला जबाबदार असतात. म्हणूनच बँकेप्रमाणे म्युच्युअल फंडची गुंतवणूक नसते. त्यामुळे जर एखादा मार्केटिंग एक्झिकेटिव्ह म्युच्युअल फंडच्या परताव्याची हमखास गॅरंटी देत असेल तर तो खोटे बोलत असल्याचे समजा.

आकडेवारी सांगितली जात नाही – आपल्याला फंडच्या कामगिरीची अचूक माहिती दिली जात नाही. त्यामुळे कोणतिही गुंतवणूक करण्यापूर्वी किमान पाच वर्षाची आकडेवारी तपासणे गरजेचे आहे. अनेकदा एजंटमंडळी एक दोन वर्षाची माहिती देतात. या अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याकडून गुंतवणूक करुन घेतली जाते आणि तेथेच फसगत होते. दरवर्षी फंड चांगली कामगिरी करेल, असे नाही. त्यामुळे बाजारातून सलग चांगला परतावा मिळत नाही.

फायद्यासाठी माहिती देणे – अधिक ब्रोकरेज मिळण्यासाठी खोटेनाटे सांगून चुकीचा फंड विकला जातो. ज्या फंडमधून अधिक ब्रोकरेज मिळतो, तोच फंड विकण्याचा प्रयत्न एजंटकडून केला जातो. मग त्यात ग्राहकांचे नुकसान असले तरी एंजट त्याचा विचार करत नाहीत. त्यामुळे खराब फंडला देखील वाढवून सांगितले जाते. फिक्स मॅच्योरिटी प्लॅनमध्ये हमखास परतावा मिळत नाही. मॅच्यूरिटीची रक्कम कमी जास्त होऊ शकते. एजंटकडून ग्राहकाला जोखीमीची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण प्रत्येकाची जोखीम उचलण्याची क्षमता ही वेगवेगळी असते.

पॉलिसीचा अर्ज चांगल्या रितीने वाचा

पॉलिसी फॉर्म काळजीपूर्वक भरा

पॉलिसी फॉर्ममध्ये अर्धवट माहिती देऊ नये

पॉलिसी फॉर्मची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.

विम्यात केवळ जोखीमीचा विचार करा. परतावा इथे लागू होत नाही.

तक्रार इथे करा – फ्री लूक पीरियडमध्ये पॉलिसी परत करु शकता. इर्डा संस्थेकडे तक्रार नोंदवू शकता. बँकेकडून पॉलिसी घेतली असेल तर बँकेच्या लोकपालाकडे तक्रार करा. बँकेच्या पॉलिसीसंदर्भातील अडचणी लोकपालच सोडवू शकतात. सेबीने ऑनलाइनवर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जर आपण प्रथमच तक्रार नोंदवत असाल तर अगोदर नोंदणी करा. नोंदणीनंतर तक्रार करु शकता.

एजंटची जबाबदारी

पॉलिसीची अचूक माहिती देणे बंधनकारक

ग्राहकाला विचार करण्यासाठी वेळ द्या

माहिती देताना घाई गडबड करु नका

खोटी माहिती देण्याचे टाळणे

गरजेपेक्षा अधिक योजना लोकांच्या माथी मारु नये

फॉर्म भरताना ग्राहकांची मदत करा.