गृहकर्जाला सुरक्षाकवच देताना…

0
151

घर खरेदीसाठी बँकेकडून गृहकर्ज घेतो, तेव्हा त्याला विमा कवच देण्याचा देखील प्रस्ताव आणला जातो. त्यास होम लोन प्रोटेक्शन प्लॅन असे म्हटले जाते. कर्जफेडीच्या काळात विमाधारकासमवेत काही अप्रिय घटना घडल्यास त्याची भरपाई विमा कंपनीकडून होते. मात्र विमा तज्ञांच्या मते, होमलोनचा विमा घेणे हा तोट्याचा व्यवहार ठरु शकतो. या तुलनेत कमी हप्त्यात टर्म प्लॅन घेणे कधीही फायद्याचे ठरु शकते.

गृहकर्जाचा विमा महागडा : जेव्हा आपण गृहकर्ज घेता तेव्हा त्यांच्या संपूर्ण रक्कमेवर विमा कवच घेण्याचे सांगितले जाते. तेव्हा त्याचा हप्ता हा एकदाच भरावा लागतो. अशा स्थितीत आपण जेव्हा 25 लाखांचे गृहकर्जाचा विमा उतरवतो, तेव्हा विमा हप्त्याची रक्कम ही गृहकर्जाच्या हप्त्याला जोडली जाते. त्यामुळे हप्त्यात वाढ होते. त्याचबरोबर केवळ गृहकर्जाला विमा कवच असल्याने जसजसे कर्ज कमी होत राहिल, तसतसे त्याचे कवचही कमी होत जाते. यातून दुहेरी नुकसान होते. अशा स्थितीत आपण गृहकर्जाचे व्याज भरण्याबरोबरच विमा कवचसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचेही व्याज भरत असता.

कुटुंबांकडून कर्जाची फेड – गृहकर्जाचा विमा हा तीन प्रकारे असतो. त्यात सर्वात पहिला म्हणजे जेवढे कर्ज तेवढे कवच. त्यात जसजसे कर्ज कमी होत राहिल, तसतसे कवचही कमी होत राहिल. याशिवाय यात अन्य काही अडचणींचा सामना करावा लागेल. उदा. आपण गृहकर्ज 8.50 टक्क्याने घेतले असेल तर कालांतराने या व्याजदरात वाढही होऊ शकते. अशा स्थितीत कर्ज घेणार्‍या व्यक्तीची कर्ज फेडण्याची क्षमता कमी होत जाते आणि दुसरीकडे कालावधी वाढत जातो. विमा कवच कमी होणार्‍या पॉलिसीत जर कर्जदाराचा अकस्मिक मृत्यू झाल्यास गृहकर्जाचे विमा कवच हे सध्याच्या कर्जापेक्षा कमी असू शकते. कारण गृहकर्जावरील व्याजदरवाढीमुळे कालावधी वाढलेला असतो. अशावेळी कुटुंबाला कर्जफेड करावी लागेल.

टर्म प्लॅनपेक्षा अधिक हप्ता : गृहकर्जाच्या विम्याचा दुसरा पर्याय म्हणजे कंपन्या फिक्स्ड कवच योजना सादर करते. त्यात विमा रक्कमेत कोणताही बदल होत नाही. तिसरा पर्याय हा हायब्रिड प्लॅनचा आहे. त्यात विमा रक्कम ही काही वर्षांपर्यंत कायम राहते आणि त्यानंतर ती कमी होत जाते. गृहकर्ज विम्याचा एक नुकसान म्हणजे त्यात बदल करण्याचा पर्याय राहत नाही. त्याचवेळी टर्म प्लॅनचा हप्ता कमी असतो आणि विमा कवचही अधिक असतो. आपण पाच हजार रुपयांपर्यंत 50 लाखांचा टर्म प्लॅन घेऊ शकता.

बँक बदलल्यास विमा कवच संपुष्टात – गृहकर्ज विमा हे केवळ महागडेच नाही तर अनेक अर्थाने ते नुकसानकारकही आहे. जर आपण कर्ज अन्य बँकेत स्थानांतरित केल्यास किंवा मुदतपूर्वीच फेडल्यास तर उर्वरित हप्त्याचा कोणताच भाग परत मिळत नाही. याशिवाय दुसर्‍या बँकेत कर्ज स्थानांतरित केल्यास त्याचवेळी विमा कवचही संपुष्टात येते. त्यानंतर पुन्हा नव्याने विमा खरेदी करावा लागतो.