कसा जडतो ‘हिमोफिलिया ए’

0
46

जखम, शस्त्रक्रिया किंवा अन्य कारणांमुळे होणार्‍या रक्तस्रावावर नियंत्रण मिळवण्यासाठी रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. पण काही घटकांच्या कमतरतेमुळे किंवा जनुकीय स्थितीमुळे अशा गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर रक्तस्रावावर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही. हिमोफिलिया या आनुवंशिक विकारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. हिमोफिलियाचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार आहेत. या विकाराची माहिती करून घेणं गरजेचं आहे. ‘हिमोफिलिया ए’ हा रक्तस्रावासंबंधीचा आनुवंशिक विकार आहे. रक्ताच्या गुठळ्या बनण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॅक्टर 8 या प्रथिनाच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या कार्यात दोष निर्माण झाल्याने हा विकार जडतो. हा आनुवंशिक विकार असला तरी अत्यंत दुमीर्र्ळ परिस्थितीत तो शरीरात होणार्‍या रोगप्रतिकाराच्या अनैसर्गिक प्रतिक्रियेमुळेही जडू शकतो. हा आजार जडणार्‍या रुग्णांच्या शरीरातून पटकन रक्तस्राव सुरू होतो. हा विकार पूर्ण बरा होत नसला तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. ‘हिमोफिलिया ए’ ला कारणीभूत ठरणार्‍या विशिष्ट जनुकामध्ये होणार्‍या बदलांमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या फॅक्टर 8 या प्रथिनाची कमतरता निर्माण होते. प्लेटलेट्स आणि फायब्रिन या घटकांमुळे रक्तात गुठळ्या तयार होतात. त्यामुळेे जखमेतून होणारा रक्तस्राव लवकर थांबतो आणि जखम लवकर भरते. पण फॅक्टर 8 च्या कमतरतेमुळे रक्तस्रावावर नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही.