प्रसूतिपश्‍चात नैराश्यावर करा मात…

0
19

‘स्लमडॉग मिलियनेअर‘ अभिनेत्री फ्रीडा पिंटो सध्या मातृत्वाचा अनुभव घेत आहे. तिचा मुलगा दोन वर्षांचा आहे. हॉलिवूड अभिनेत्री प्रसूतिनंतरच्या काळाबद्दल मोकळेपणाने बोलते. एका मुलाखतीत तिने सांगितले की, मुलगा झाल्यानंतर तीन महिने ती खूप घाबरली होती. तिला उदास वाटत होते. यातून बाहेर पडण्यासाठी आपण एका थेरपिस्टची मदत घेतली असे तिने एका मुलाखतीत सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीसोबतही असेच घडले. तिने पहिले मूल झाल्यानंतर आलेल्या मानसिक अस्थिरतेबद्दल सांगितले. तिच्या संसारिक आयुष्यावर याचा मोठा परिणाम झाला. ‘जागतिक आरोग्य संघटने‘च्या मते 22 टक्के स्त्रिया प्रसूतिनंतर नैराश्याने त्रस्त असतात. आई होणे ही सर्वात चांगली भावना असली तरी बाळाला जन्म दिल्यानंतरच्या काळात चिंता आणि दुःख वाटणे ही एक वेगळी समस्या आहे. महिलांना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसूतिपश्‍चात उदासीनता जाणवणे ही एक मानसिक समस्या आहे. यामुळे तुमचे विचार, भावना किंवा कृती यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ही एक गंभीर समस्या मानली जाते. गर्भधारणेपासून प्रसूतिपर्यंतचा आव्हानात्मक काळ हे पोस्ट डिप्रेशनचे कारण असू शकते.

गर्भधारणा झाल्यावर महिलांमध्ये मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अनेक बदल होतात. प्रामुख्याने हॉर्मोनल बदलांमुळे ही समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्स वाढू लागतात. इतकेच नाही, तर या दरम्यान थायरॉइड कमी होण्यास सुरुवात होते. यामुळे नीट झोप येत नाही. प्रेग्नन्सीदरम्यान वाढलेले वजन आणि नवजात बाळाची काळजी ही प्रसूतिपश्‍चात आलेल्या नैराश्याची प्रमुख कारणे असू शकतात. प्रत्येक स्त्रीमध्ये याची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. भूक न लागणे, दिवसभर उदास राहणे, सतत चिंता वाटणे आणि विनाकारण रडू येणे, झोपेची कमतरता, थकवा, अशक्तपणा जाणवणे यातील कोणतेही लक्षण आढळते. कोणत्याच कामात रस नसणे, सतत चिडचिड होणे, राग येणे हीसुद्धा लक्षणे अनेक महिलांमध्ये दिसून येतात. प्रसूतिनंतर आलेल्या नैराश्यावर काय उपचार करायचा हे लक्षणांवर अवलंबून असते. यासाठी डॉक्टर कधी औषधे तर कधी समुपदेशनाचा सल्ला देतात. नैराश्य टाळण्यासाठी महिलांनी प्रसूतीनंतर जीवनशैलीत बदल करावा, दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा, योगासने आणि व्यायाम करावा. तणावग्रस्त वातावरणातून ब्रेक घ्यावा, पोषक पदार्थांचे सेवन करावे तसेच जीवनातील बदल स्वीकारावा आणि काही समस्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर कराव्यात असा सल्ला दिला जातो. तसंच आपल्या आणि बाळाच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.