मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोट्यवधींनी वाढ!

0
47

आजघडीला भारतात मधुमेहाचे दहा कोटीहून अधिक रुग्ण आहेत. 2019 मध्ये ही संख्या सात कोटी होती. म्हणजेच, केवळ चार वर्षांमध्ये चार कोटी नागरिकांना मधुमेहाची लागण झाली आहे. टक्केवारीनुसार ही वाढ 44 टक्के आहे. अधिक धक्कादायक म्हणजे सुमारे साडेतेरा कोटी नागरिक प्री-डायबेटिक आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश नागरिकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. ही आकडेवारी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ने ब्रिटनच्या ‘लॅन्सेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. गोवा, पुदुच्चेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका मधुमेह रुग्णामागे चार ‘प्री-डायबेटिक’ केसेस आहेत, अशी माहितीही ‘लॅन्सेट’मध्ये देण्यात आली. लठ्ठपणा, संथ जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहास ही मधुमेहाची तीन प्रमुख कारणे आहेत. ‘आयसीएमआर’च्या अहवालानुसार, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दहा कोटींहून अधिक आहे. 2019 मध्ये ही संख्या सात कोटी इतकी होती. काही विकसित राज्यांमध्ये ही संख्या स्थिर होत आहे; मात्र इतर अनेक राज्यांमध्ये मोठी वाढ दिसत आहे.

देशातील किमान 13.6 कोटी नागरिक प्री-डायबेटिक आहेत, असे अभ्यासात दिसून आले. गोव्यामध्ये 26.4 टक्के, पुदुच्चेरीमध्ये 26.3 टक्के आणि केरळमध्ये 25.5 टक्के इतका मधुमेहाचा प्रसार दिसून आला. येत्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्यांमधील रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला. गोवा, केरळ, तामिळनाडू आणि चंदीगडमध्ये मधुमेहाच्या रुग्णांपेक्षा प्री-डायबेटिक रुग्ण कमी असल्याचे ‘मद्रास डायबेटिक रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि अहवालाचे पहिले लेखक डॉ. रणजित मोहन अंजना यासंदर्भात बोलताना म्हणाले. पुद्दुचेरी आणि दिल्लीमध्ये हे प्रमाण बर्‍यापैकी समान आहे. यानुसार तेथील रुग्णांची संख्या स्थिर होत आहे, असे म्हणता येईल. परंतु शास्त्रज्ञांनी मधुमेहाचे मोजके रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये प्री-डायबेटिक लोकांची संख्या जास्त असल्याचे नोंदवले आहे.