निवड

0
87

अतिशय श्रीमंत असलेल्या देवरामने एक सुंदर मंदिर तयार करून घेतले. मंदिरात देवाची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा करण्यासाठी पूजारी ठेवला. मंदिरात गरीब भक्त साधू-संत असे लोक आले तर त्यांना 4-5 दिवस रहाता यावे, त्यांना रोज खाण्यास मिळावे त्यासाठी मंदिराच्या नावाने घेतलेल्या शेतीच्या उत्पन्नावर मंदिरातील खर्च भागत होता. देवराम यांना मंदिरातील सर्व कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका सज्जन माणसाची आवश्यकता होती. माझ्या मनाला जो योग्य वाटेल असा सज्जन माणूस मी स्वतः निवडण्याचा प्रयत्न करीन. या विचाराने दररोज देवराम मंदिराच्या परिसरात जाऊन बसत असत. दर्शनास येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक माणसाचे निरीक्षण करत असत. एकदा मंदिरात आलेल्या व्यक्तिकडे त्यांचे लक्ष गेले. देवरामांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, तुम्ही या मंदिराच्या व्यवस्थापकाचे काम कराल का? त्यासाठी एका सज्जन व्यक्तिची गरज आहे. तुम्ही मला योग्य वाटता. तो गरीब माणूस म्हणाला, ते कसे काय? त्यावर देवराम म्हणाले, मंदिराच्या रस्त्यावर जो दगड आहे त्याचा थोडासा कोपरा वर आला होता. त्याला ठेचकाळून बरेच लोक पडत होते. पण फक्त तुम्ही तो दगड उकरून काढून बाजूला फेकून दिला. हे सर्व मी पाहात होतो. त्यावर गरीब माणूस म्हणाला, रस्त्यावर पडलेले दगड काटे बाजूला फेकून देणं हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्या व्यक्तिचे हे मत ऐकल्यावर देवरामांनी त्या सज्जन माणसाची मंदिराच्या व्यवस्थापक पदी नेमणूक केली.

तात्पर्य – जी माणसे कर्तव्याची जाण ठेवून त्याचे पालन करतात, तीच खरी सज्जन.