फुलपाखरांबाबत नवा दावा

0
64

निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार म्हणजे फुलपाखरं, रंगीबेरंगी, फुलांवरून भिरभिरणारी फुलपाखरं डोळ्यांनान सुखद विसावा देत असतात. आता संशोधकांनी फुलपाखरांचा जगातील सर्वात मोठा वंशवृक्ष बनवला आहे. त्यानुसार सध्याच्या मध्ये आणि उत्तम अमेरिकेतील पतंगांपासून पहिल्यावहिल्या फुलपाखरांचा विकास झाला. तब्बल दहा कोटी वर्षांपूर्वी अशा पद्धतीने तिथे फुलपाखरं विकसित झाली. त्या काळात पृथ्वीवरील सुरूवातीचा एकच खंड असलेला ‘पँजिया’ भंगण्याच्या मार्गावर होता. उत्तर अमेरिका खंड पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन भागांमध्ये विभाजित झाला. या खंडांच्या पश्‍चिमेकधील भागात फुलपाखरं विकसित झाली. सध्या फुलपाखरांच्या अंदाजे 20 हजार प्रजाती अस्तित्वात आहेत. त्या अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व खंडांमध्ये आढळतात. यापूर्वीही संशोधकांना फुलपाखरं कधी विकसित झाली याबाबतची माहिती होती; पण ती नेकमी कधी विकसित झाली आणि त्यांचा सुरूवातीच्या काळातील आहार काय होता, हे माहिती नव्हते. फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील क्युरेटर आणि फुलपाखरांचे अभ्यासक अकितो कावाहारा यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने याबाबतचे संशोधन केले. त्यांनी 90 देशांमधील 2300 प्रजातींच्या फुलपाखरांमधील 391 जनुकांची संगती लावून त्यांचा नवा वंशवृक्ष तयार केला. त्यामध्ये सध्याच्या ज्ञात अशा 92 टक्के प्रजातींचा समावेश झालेला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’या नियतकालिकाच्या 15 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात देण्यात आली आहे.