घरचा आहेर

0
79

तो महाकंजूष शेटजी शेजारी कोणी नाही, हे पाहून आपल्या तिजोरीतले पैसे मोजत होता. इतक्यात त्याचा पोपट पिंजर्‍यातून निसटून तेथे आला. त्यातील एक सोन्याची मोहोर चोचीत धरून त्याच खोलीतल्या कोनाड्यात दडवून ठेवू लागला. एकदा मोजलेले पैसे शेटजी पुन्हा मोजू लागला असता सोन्याची एक मोहोर कमी भरली. तेव्हा दुःखी होऊन उभा राहिला. समोर पाहतो, तर पोपट कोनाड्यात काहीतरी दडवीत असलेला दिसला. तेव्हा तो पोपटाला म्हणाला, ‘‘अरे चोरा तूच चोरलीस ना सोन्याची मोहोर. अरे पण तुला तिचा काही उपयोग तरी आहे का? उलट तुझ्या या चोरीबद्दल मी तुला चांगलीच शिक्षा मात्र करीन. जीवसुद्धा घेईन बघ.’’ हे ऐकून पोपट म्हणाला, ‘‘शेटजी उगीच संतापू नका. तुम्ही जे करता तेच मी केले. मी फक्त एक मोहोर लुबाडून दडवून ठेवली तर तुम्ही शिक्षा म्हणून माझा जीव घेईन म्हणता. मग तुम्ही या हजारो मोहोरा लुबाडून दडवून ठेवल्याबद्दल तुम्हाला कोणती जबर शिक्षा द्यावी हे सांगाल काय?’’ यावर शेटजीची दातखीळच बसली.

तात्पर्य – आपले दोष न पाहता दुसर्‍यांच्या दोषाला नावे ठेवणे हा काहींचा स्वभावच असतो.