माकडाचा उपद्व्याप

0
55

काही सुतार लोक नदीकाठी असलेले एक झाड कापत होते. अर्धे लाकूड कापून होताच कापलेल्या लाकडात पाचर ठोकून सुतारमंडळी जेवणासाठी घरी गेली. जवळच्याच झाडावर एक माकड सुतारांची करामत गमतीने पाहत होते. सुतार मंडळी जेवायला जाताच त्यांची गंमत करावी, या हेतूने माकड खाली उतरुन लाकडाजवळ गेले आणि लाकडावर बसून त्याने सुतारांनी ठोकलेली पाचर उपसून काढली. त्याबरोबर लाकूड मिटले आणि नेमकी त्यात माकडाची शेपटी चांगलीच अडकली. माकड शेपटी ओढून काढण्याचा प्रयत्न करु लागले, पण ती काही निघेना. इतक्यात सुतार मंडळी तेथे आली. त्यांनी माकडाचा प्रताप पाहून त्याला चांगले बदडून काढले. या माराने माकड जागीच मरुन पडले.

तात्पर्य – नसत्या उठाठेवी केल्यास पश्‍चातापाची पाळी येते.