रिक्षातून प्रवास करताना वृद्ध दाम्पत्याची ८५ हजार रुपयांची रोकड गेली चोरीला

नगर – बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी पैसे घेऊन रिक्षातून निघालेल्या दांपत्याकडील ८५ हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सावेडी उपनगरातील स्टेट बँकच्या शाखेपासून ते दिल्लीगेट दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शाम दत्तात्रय कुलकर्णी (वय ६३, रा. निर्मलनगर, भगवान बाबा चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी दुपारी सव्वा वाजता शाम व त्यांच्या पत्नी कल्पना सावेडी उपनगरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी शाखेतून १ लाख १० हजार रूपये काढले व ते पैसे कापडी पिशवीमध्ये ठेवले. दरम्यान, त्यांना नवी पेठ येथील शहर सहकारी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी जायचे असल्याने ते एका रिक्षामध्ये बसून नवी पेठे येथे जाण्यासाठी निघाले. पत्रकार चौकात रिक्षा आली असता तेथे दोन अनोळखी महिला व एक मुलगी रिक्षात बसली. शाम व त्यांची पत्नी दिल्लीगेट येथे उतरून पायी शहर सहकारी बँकेत गेले. तेथे गेल्यानंतर पिशवीतील पैसे पाहिले असता त्यातील थोड्याच नोटा शिल्लक असल्याच्या दिसून आल्या. त्यांनी त्या मोजल्या असता २५ हजार रूपये भरले. रिक्षा प्रवासात ८५ हजार रूपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सावकारी व्यवहाराचे दप्तर जमा न केल्याने एकावर गुन्हा दाखल

नगर – उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांनी रद्द केलेल्या सावकारी परवाना वरील व्यवहाराचे संपुर्ण दप्तर जमा करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन ही सहाय्यक निबंधक कार्यालयात दप्तर जमा न केल्याप्रकरणी एका जणा विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी सचिन अदिनाथ ताठे (रा. सावेडी) यांचे सावकारी परवाना रद्द केलेला होता. त्यानंतर त्यांना दि. २३ सप्टेंबर २०२४ पासुन ते १ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत या परवाना वरील व्यवहाराचे संपुर्ण दप्तर जमा करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन तसेच १६ डिसेंबर २०२४ व १ जानेवारी रोजीच्या सुनावणी वेळी संधी देऊन ही त्यांनी दप्तर जमा केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अल्ताफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन ताठे यांचे विरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील नियम ४६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

नेहरू मार्केटची जागा अतिक्रमणमुक्त करून भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करावी

अहिल्यानगर हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय झिंजे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

नगर – चितळे रोडवरील नेहरू मार्केटची प्रत्यक्ष पाहणी करून ती जागा अतिक्रमणमुक्त करून भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी अहिल्यानगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यांच्यासमवेत चंद्रकांत उजागरे उपस्थित होते. आयुक्तांनी निवेदनाची दखल घेत प्रत्यक्ष पाहणीसाठी ७ जानेवारी रोजी येण्याचे आवश्वासन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नवीन वर्षांत आपल्या आदेशाने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेचे स्वागतच आहे. त्याचवेळी शहरातील हॉकर्स युनियनचा अध्यक्ष म्हणून आपणासमोर काही वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे. शहरातील चितळे रोडवरील ऐतिहासिक नेहरू मार्केटची इमारत १३ वर्षांपूर्वी नवीन मोठे संकुल बांधण्यासाठी भुईसपाट करण्यात आली. आज तेरा वर्षानंतर येथे काहीच झाले नाही. उलट ही जागा महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाच्या चुकीचे स्मारक बनली आहे. मनपाच्या मालकीची ही मोकळी जागा ना गाळेधारक भाजीविक्रेत्यांच्या उपयोगाची राहिली ना महापालिकेच्या कामाची राहिली. याठिकाणी सध्या अनेक अतिक्रमणे झाली आहेत. टपर्‍या टाकण्यात आल्यात. अनेक जण येथे कचरा आणून टाकतात. लघुशंका करण्यासाठी याच जागेचा उपयोग केला जातो. तसेच अनेकांच्या खाजगी चारचाकी, दुचाकी येथे पार्क केलेल्या असतात. संपूर्ण जागाच अतिक्रमणांनी गिळंकृत केली आहे. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यास लगेचच लक्षात येईल. मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक चितळे रोडवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. वास्तविक एवढी मोठी मोकळी जागा असताना त्यांना नाईलाजाने रस्त्यावर बसावे लागत आहे. मनपाने या जागेवर पे अ‍ॅण्ड पार्क न करता ती जागा अतिक्रमण मुक्त करून दिल्यास भाजी विक्रेते तिथे बसण्यास तयार आहेत. त्यामुळे रस्ताही मोकळा होईल व वाहतुकीला अडथळाही होणार नाही. या जागेची व्यवस्थित साफसफाई करून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्यावे तसेच चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून दिल्यास भाजी, फळ विक्रेत्यांचा मालही सुरक्षित राहिल. तसेच याठिकाणी लाईटचीही व्यवस्था करावी. त्यामुळे या जागेचा अनधिकृतपणे सुरु असलेला गैरवापरही थांबेल आणि भाजी विक्रेत्यांनाही हक्काची जागा मिळेल. पे अ‍ॅण्ड पार्क सारखे धोरण राबवून या परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार नाही हे वास्तव आहे. गोरगरीब भाजी, फळ विक्रेत्यांना न्याय मिळावा असे झिंजे यांनी म्हटले आहे

मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने कर्जदारास ४ महिने सश्रम कारावास

कर्ज रक्कम व दंडापोटी ५ लाख २० हजार एका महिन्यात भरण्याचे आदेश

नगर – व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम विहित मुदतीत परतफेड न करणार्‍या कर्जदाराला नगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश तेजस्विनी निराळे यांनी ४ महिने सश्रम कारावासाची तसेच कर्ज रक्कम व दंडापोटी ५ लाख २० हजार एका महिन्यात संस्थेकडे भरण्याचे आदेश दिले आहेत. पोपट बाळासाहेब शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) असे या कर्जदाराचे नाव आहे. कर्जदार शेवाळे यांनी लक्षवेध मल्टीस्टेट च्या पाईपलाईन रोड शाखेतून व्यवसाय वाढीसाठी ४ लाख रुपयांचे कर्ज दि.१९ मे २०२३ रोजी घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्याची मुदत १०० दिवसांची होती. मात्र त्यांनी कर्ज घेतल्या पासून ४ महिने काहीही रक्कम भरली नाही. त्याने कर्ज परतफेडीसाठी संस्थेला ४ लाख ७५ हजारांचा धनादेश दिला. तो संस्थेने दि. १८ सप्टेबर २०२३ रोजी बँक खात्यात भरला असता कर्जदाराच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो न वटता परत आला. त्यामुळे संस्थेने शेवाळे यास नोटीस पाठविली. मात्र त्याने त्यास काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संस्थेचे वसुली अधिकारी सुभाष तुकाराम आरडे यांनी अ‍ॅड. आर.बी. गाली यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात कर्जदार पोपट शेवाळे याच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅट १८८१ चे कलम १३८ नुसार दावा दाखल केला होता. त्यावर नगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश तेजस्विनी निराळे यांच्या समोर सुनावणी होवून न्या. निराळे यांनी कर्जदार शेवाळे यास दोषी धरत ४ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कर्ज रक्कम व दंडापोटी ५ लाख २० हजार रुपये एका महिन्यात लक्षवेध मल्टीस्टेट या संस्थेकडे भरण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता

नगर – ख्रिस्त जन्मोत्सव हा सर्व जगभर मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत असतो. या आनंदी क्षणी सर्वांनी एकत्रित येऊन विचारांची देवाण घेवाण केली पाहिजे. आजच्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन विविध उपक्रमात सहभागी होत हा उत्सव आनंदाने साजरा केला आहे. अशा उपक्रमातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत असतो. यामुळे येणारा काळात आपण अडचणीवर मात कराल. मेळाव्यातून जो आनंद सर्वांना मिळाला आहे, तो वर्षभर पुरणारा आहे. हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, अशी शुभकामना रेव्ह.अभिजित तुपसुंदरे यांनी व्यक्त केली. अहमदनगर पहिली मंडळी नाशिक धर्मप्रांत (सी. एन.आय.)च्यावतीने ख्रिस्तजन्मोत्सव २०२४ निमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी रेव्ह. अभिजित तुपसुंदरे आदिंसह सर्व कमिटीचे मेंबर्स, तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी सर्व सन्मानिय सभासद उपस्थित होते. या आनंद मेळाव्यात लहान मुलांसाठी रनिंग, फुगे फोडणे, लिंबू चमचा तर महिलांसाठी संगित खुर्ची, स्लो मोपेड, कपल्ससाठी सुई-दोरा ओवणे, पुरुषांसाठीही अशाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांसाठी विविध प्रकारच्या खाद्यांचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यांचा आनंद सर्वांनी लुटला. यावेळी केक कापण्यात येऊन फटायांची आतिषबाजी करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता चर्चचे धर्मगुरु रेव्ह. अभिजीत तुपसुदरे, सचिव सतिश मिसाळ, उपसचिव प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे, कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे, प्रा. बिनीत गायकवाड, रविद्रं लोंढे, सुनित ढगे, अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, सौ. शोभना गायकवाड, सौ. वंदना शिंदे, सौ. कांदबरी सुर्यवंशी, सौ. शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले महिला मंडळ, चर्च सभासद यांचे सहकार्य लाभले

खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते

डॉ. भाऊसाहेब सोनवणे यांचे प्रतिपादन; केडगावच्या सरस्वती विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

नगर – खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते. या सोबतच भावनिक विकासही होतो. त्यामुळे खेळात सहभागी व्हायला हवे. स्पर्धेमध्ये शिस्त दाखवा, स्वतःमध्ये सांघिक भावना विकसित करा, अपयश आले की खचून न जाता जिद्दीने परत उभे राहून पुढे जाण्याची तयारी करण्याचे प्रा.डॉ. भाऊसाहेब सोनवणे यांनी आवाहन केले. केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेसह स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. भाऊसाहेब सोनवणे हे होते. प्रा.डॉ. अरुणराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सहकोषाध्यक्ष प्रा.डॉ. रावसाहेब पवार, बीएड कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, संस्था समन्वयक डॉ. रवींद्र चोभे, प्रज्ञाताई आसनीकर, माजी नगरसेवक संभाजीराजे पवार, सावेडी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काजळे, शाळेचे मुख्याध्यापक संदिप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, पालक प्रतिनिधी स्वातीताई कोळपळकर, विद्यार्थी प्रतिनिधी यशराज पाचारणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी दिया काकडे, अविनाश साठी, शिवाजी मगर आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. जिल्हास्तरावर सुवर्ण, रौप्य, कास्य पदक पटकावून विभागीयस्तरावर यश प्राप्त करणार्‍या खेळाडूंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्यातील कलागुण विकसीत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे उपस्थित पाहुण्यांनी कौतुक करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. सुरेखा कसबे यांनी आभार मानले.

महापालिकेचे स्वच्छता अभियान सुरू; स्टेट बँक चौक ते कोठी चौकात स्वच्छता

प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्या वापराव्यात; अभियानात सहभागी होण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आवाहन

नगर – म हानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचर्‍यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी नागरीक, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून, सहभागातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक शनिवारी शहर व उपनगराच्या एकेका भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. शनिवारी महानगरपालिकेने स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. यात या रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे या भागात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्यावर पडलेला कचरा, माती व बांधकाम व पाडकामाचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याच्या दुभाजकाच्यामध्ये साचलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. अभियानात नागरीक सहभागी झाले होते. नागरिकांनी . प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करतानाच शहर स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात नागरीक, सामाजिक संघटनेने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे.

सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना निवेदन

नगर – शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांनी भारतातील सर्व रेल्वे स्टेशनला पत्र पाठवून नामांतरची प्रक्रिया सुरु झालेली असून, लवकरच नवीन नाव लावले जाणार असल्याचे आश्वासन दिले. नगरच्या रेल्वे स्थानकावर आलेले रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना निवेदन देऊन झालेल्या नामांतराबाबत सबलोक यांनी लक्ष वेधले. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे अहमदनगर हे नाव बदलून आता अहिल्यानगर झाले आहे. त्याला केंद्र सरकारने देखील मंजुरी दिलेली आहे. लवकरात लवकर अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी मागणी केली आहे.

गोविंदपुरा येथे गुरु गोविंद सिंग यांची ३५८ वी जयंती साजरी

गोविंदपुरा येथे गुरु गोविंद सिंग यांच्या ३५८ व्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी गुरुद्वारास भेट देत दर्शन घेतले

नगर – गोविंदपुरा गुरुद्वाराभाई दयासिंगजी येथे शीख, पंजाबी, सिंधी समाजाने एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रमाने दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त जगाच्या शांततेसाठी प्रार्थना केली व धार्मिक गीत गायन, अखंड पाठ, भजन किर्तन, कथा आयोजित करण्यात आले होते. यावेळी गुरुगोविंद सिंग यांच्या जीवन संदर्भात माहिती दिली. गुरुगोविंद सिंग कोण होते. यासंदर्भात त्यांच्या वडिलांचे नाव गुरु तेग बहादुर होते आणि ते शीखांचे नववे गुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर गुरु गोविंद सिंग शीख धर्माचे दहावे गुरु बनले. गोविंद सिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ मध्ये पटना बिहार मध्ये झाला. त्यांचा जन्मदिवस गुरुंच्या जन्म उत्सव नानकशाही कॅलेंडरवर आधारित आहे. या वर्षी गुरु गोबिंद सिंग जयती ६ जानेवारी म्हणजेच आज सर्वत्र साजरी केली जात आहे. गुरु गोबिंद सिंह नी संत सैनिकांच्या खालसा दलाची स्थापना १६९९ मध्ये केली होती. ते जातिवाद आणि अंधविश्वास यांच्यावर विश्वास ठेवत नसे आणि कोणी यावर विश्वास ठेवू नये असे त्यांचे म्हणणे होते. गुरुगोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी गुरुद्वाराला भेट देत दर्शन घेतले, समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान गुरुद्वाराचे हेड ग्रंथीभाई गुरुभेदसिंग हजुरी, जयाभाई समरथसिंगजी व अमृतसरचे भाई सुखप्रीत सिंग साज यांनी भाविकांना कीर्तनाने मंत्रमुग्ध केले, बोले सो निहाल, सतसीअकाल व वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी कि फतेहच्या गर्जनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

 

कंपनीतून १५ लाख ५५ हजारांच्या रोकड चोरी

स्टेशन रस्त्यावरील घटना, चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद

नगर – एमआयडीसी येथील लासिक व्हील लिमिटेड कंपनीच्या स्टेशन रस्त्यावरील कार्यालयातून चोरट्याने कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ठेवलेली १५ लाख ५५ हजारांची रोकड चोरून नेली. शनिवारी (दि.४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. चोरट्याने ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी सुनिल शांतीलाल मुनोत (वय ६०, रा. हिरकेश बंगलो, प्लॉट नं. ४२ (अ), स्टेशनरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील मुनोत हे लासिक व्हील लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचे ऑफीस त्यांच्या हिरकेश बंगल्यातच आहे. तेथूनही ते कंपनीचे व्यवस्थापकीय कामकाज, कर्मचार्यांचे पगार करतात. शुक्रवारी (दि.३) त्यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ऑफीस बंद केले. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ऑफीसच्या सफाई कामगाराला साफसफाई करताना ऑफीसमधील ड्रॉव्हर तोडल्याचे दिसले. तिने ऑफीसमधील कर्मचार्याला याची माहिती देताच कर्मचार्याने मुनोत यांना फोन करून माहिती दिली. मुनोत यांनी पाहणी केली असता ऑफीसमधील टेबलचे ३ ड्रॉव्हर तोडल्याचे व त्यात कर्मचार्यांचे पगार करण्यासाठी ठेवलेली १५ लाख ५५ हजारांची रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात चोरट्याने ऑफीसच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून आत प्रवेश करून चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्याने ऑफिसमध्ये प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्याने पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. चोरट्याची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.