स्टेशन रस्त्यावरील घटना, चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद
नगर – एमआयडीसी येथील लासिक व्हील लिमिटेड कंपनीच्या स्टेशन रस्त्यावरील कार्यालयातून चोरट्याने कर्मचार्यांच्या पगारासाठी ठेवलेली १५ लाख ५५ हजारांची रोकड चोरून नेली. शनिवारी (दि.४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. चोरट्याने ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी सुनिल शांतीलाल मुनोत (वय ६०, रा. हिरकेश बंगलो, प्लॉट नं. ४२ (अ), स्टेशनरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील मुनोत हे लासिक व्हील लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचे ऑफीस त्यांच्या हिरकेश बंगल्यातच आहे. तेथूनही ते कंपनीचे व्यवस्थापकीय कामकाज, कर्मचार्यांचे पगार करतात. शुक्रवारी (दि.३) त्यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ऑफीस बंद केले. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ऑफीसच्या सफाई कामगाराला साफसफाई करताना ऑफीसमधील ड्रॉव्हर तोडल्याचे दिसले. तिने ऑफीसमधील कर्मचार्याला याची माहिती देताच कर्मचार्याने मुनोत यांना फोन करून माहिती दिली. मुनोत यांनी पाहणी केली असता ऑफीसमधील टेबलचे ३ ड्रॉव्हर तोडल्याचे व त्यात कर्मचार्यांचे पगार करण्यासाठी ठेवलेली १५ लाख ५५ हजारांची रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात चोरट्याने ऑफीसच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून आत प्रवेश करून चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्याने ऑफिसमध्ये प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्याने पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. चोरट्याची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.