एस.टी. बस प्रवासादरम्यान महिलेचे चार लाख रुपयांचे दागिने चोरीला

0
24

नगरच्या माळीवाडा बसस्थानक ते शेवगाव दरम्यान घडली घटना 

नगर – एस.टी. बस प्रवासा दरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला गेलेले असताना आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. नगरहून शेवगाव कडे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकातून एस टी बस मध्ये बसलेल्या केडगाव मधील महिलेचे पर्स मध्ये ठेवलेले सुमारे ४ लाख ४ हजार रुपये किमतीचे ५ तोळे ६ ग्रॅम वजनाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२) सकाळी ९.३० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत स्मिता कल्याण पागिरे (रा. रेणुका नगर, केडगाव, मूळ रा. आंतरवाली, ता. शेवगाव) यांनी गुरुवारी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पागिरे या नगरहून खंडोबानगर, शेवगाव येथे जाण्यासाठी सकाळी माळीवाडा बस स्थानकात आल्या होत्या. त्या नगर शेवगाव बस मध्ये बसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जवळील मोठ्या पर्स मध्ये एका लाल रंगाची छोटी पर्स ठेवली होती. त्यात सुमारे ४ लाख ४ हजार रुपये किमतीचे ५ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, कानातील टॉप, वेल असे दागिने ठेवलेले होते. बस प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स मधील दागिने ठेवलेली छोटी पर्स चोरली. शेवगावमध्ये गेल्यावर ही चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी सायंकाळी पुन्हा नगर मध्ये येत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान सध्या लग्न सराई सुरु असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी महिला वर्ग एस टी बसला जास्त पसंती देत आहे. बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत शासनाने लागू केलेली असल्याने महिलांची नेहमीच एस टी बस प्रवासासाठी गर्दी होताना दिसत आहे. याच गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारे चोरटे सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रीय झालेले आहेत. शहरासह जिल्ह्यात बस स्थानकावर तसेच बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या चोरट्यांनी पोलिसांसमोर एकप्रकारे आव्हानच उभे केलेले आहे. त्यामुळे बस प्रवासात महिलांनी दागिने सांभाळण्याची गरज आहे.