राजकीय दबावापोटी सरपंचाला अरेरावीची भाषा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

0
61

आर्थिक तडजोड न केल्याने चार्जशीट थांबून जिल्हा बंदी करण्याचा हट्ट; महाविकास आघाडीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

नगर – सध्या नगर दक्षिण मतदार संघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जोर जबरदस्तीच्या उद्देशाने पोलीस कायदा हातात घेत असल्याचे दिसून येत आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयात नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे पोलिसांचा फौज फाटा घेऊन आले व ग्रामपंचायत कार्यालयात घुसून चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडेराव पवार यांना धमकावून विचारणा केली की तू गावामध्ये कसा काय आला? बाहेर चल, लगेच गाडीत बस, नाटक करू नको तू आमच्या गोष्टी मिटवलेल्या नाही आम्हाला वरून प्रेशर आले आहे, असे बोलत शिवीगाळ केली. याबाबत सरपंच शरद पवार यांनी त्यांना सांगितले की तीन महिन्यापूर्वी माझ्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर आहे. त्यामध्ये मला गावाच्या विकासात्मक धोरणामध्ये ग्रामपंचायत मीटिंग पाणीपुरवठा व महत्त्वाच्या मीटिंगमध्ये गावामध्ये येण्यास परवानगी आहे. त्यामुळे आज गावात आलो आहे. याबाबत २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नगर तालुका पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार करून सरपंच गावात जाणार असल्याची कल्पना दिलेली होती. तरी देखील सदर गुन्ह्यातील चार्जशीट दाखल होईपर्यंत मला गाव बंदी आहे.

सदर गुन्ह्याला गुन्हा घडवून ३ महिने उलटून गेले तरी देखिल पोलिसांनी चार्जशीट दाखल केलेली नाही व याबाबत विचारणा केली तर तू आमची पैशाची मागणी पूर्ण केलेली नाही त्यामुळे मी तुझे चार्जशीट दाखल करणार नाही असे म्हणत तुला गाव बंदी केली आहे. यानंतर जिल्हा बंदी करणार त्यामुळे आमचं मिटून घे असे काही दिवसापूर्वी सांगितलेले होते. सदर सरपंचाने पोलीस निरीक्षकांची मागणी पूर्ण न केल्याने ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग मधून बाहेर काढले व गावकर्‍यासमोर बदनामी होईल अशा पद्धतीने अवाच्य भाषेत शिवीगाळ केली. या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते घनश्याम शेलार, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष किसनराव लोटके, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे, सरपंच शरद पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, चंदू पवार, भारत बोडखे, अरुण म्हस्के, बाबासाहेब सय्यद, दीपक झोडगे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.