ठेवी परत न करता एका पतसंस्थेने केली दुसऱ्या पतसंस्थेची ४९ लाखांची फसवणूक

0
14

जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – एका पतसंस्थेने दुसर्‍या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत न करता ४९ लाख ५४ हजार ९६१ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. (शाखा गुलमोहर रस्ता, सावेडी, नगर) तसेच सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, शाखाधिकारी अशा १८ जणांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीएआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे (ज्ञानेश्वर चौक, पाईपलाईन रस्ता, सावेडी, नगर) संचालक व सचिव धोंडीराम शंकर राऊळ (वय ६१ रा. सावेडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. शाखा गुलमोहर, संस्थापक अध्यक्ष हेमा सुरेश सुपेकर (रा. नगर), उपाध्यक्ष अशोक गंगाधर गायकवाड (रा. नवलेनगर, गुलमोहर रस्ता, सावेडी), संचालक राहुल अरूण दामले (रा. प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी), मनिष दत्तात्रय कुटे (रा. डी. पी. रस्ता, औंध, पुणे), राजेंद्र सुखलाल पारख (रा. खिस्तगल्ली, नगर), अजय चंद्रकांत आकडे (रा. महात्मा फुले चौक, नगर), मधुकर मारूतीराव मुळे (रा. माळीवाडा), प्राजक्ता प्रकाश बोरूडे (रा. बोरूडे मळा, नगर), नवनाथ भिकाजी शेटे (रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), विजय बन्सीलाल मुनोत (रा. शेरकर गल्ली, माळीवाडा), संजय चंद्रकांत खोडे (रा. समता चौक, सिव्हिल हाडको, सावेडी), चंद्रकांत सुरजमल आनेचा (रा. सिव्हिल हाडको, सावेडी), प्रकाश बाबुलाल बच्छावत (रा. अहिल्यानगरी, पाईपलाईन रस्ता, सावेडी), मच्छिंद्र भिकाजी खाडे (रा. अर्जुननगर, सावेडी), शामराव हरी कुलकर्णी (रा. रासणेनगर, सावेडी), सुनील रंगनाथ वाघमारे (रा. महाल मंगल कार्यालयाशेजारी, नगर) व शाखाधिकारी शैलेंद्र ज्ञानेश्वर सुपेकर (रा. गणेश कॉलनी, पाईपलाईन रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राऊळ हे सन २००१ पासून ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक व सचिव म्हणून काम पाहतात. सदरची पतसंस्था सभासदाकडून ठेवी गोळा करून कर्ज वाटप करण्याचा व्यवसाय करत असते. या पतसंस्थेचे संचालक अशोक गायकवाड हे श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटचे संचालक व उपाध्यक्ष आहेत. गायकवाड व श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटचे इतर संचालक यांनी ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत जमा असलेल्या ठेवीच्या रक्कमा श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटमध्ये ठेव म्हणून ठेवल्यास संस्थेला चांगला आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखविले होते. तसेच कायम ठेव ठेवल्यास चांगले व्याज मिळेल, ठेवी सुरक्षीत राहतील याबाबत आश्वासन देवून ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या सर्व संचालकांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान याबाबत ज्ञानेश्वर पतसंस्थेतील काही संचालकांनी त्यास हरकत घेतली असता अशोक गायकवाड याने त्याच्या अधिकाराचा दुरूपयोग करून २ ऑगस्ट २०१६ रोजी २० लाख ३२ हजार ८७५ रूपये व १० सप्टेंबर २०१६ रोजी २९ लाख २१ हजार ४८६ रूपये असे एकुण ४९ लाख ५४ हजार ९६१ रूपये कायम ठेवी ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान ठेवीची मुदत संपल्यानंतर फिर्यादी राऊळ यांनी संस्थेच्या वतीने श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटकडे ठेवींच्या रकमेची मागणी केली असता संशयित आरोपी यांनी रक्कम परत दिली नाही. रक्कम देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून मुदती मागितल्या. वेळोवेळी पत्रव्यवहार केला असता अद्यापपर्यंत रक्कम मिळाली नाही. रक्कमेची मागणी करतात म्हणून अशोक गायकवाड व इतरांनी ५ मे २०२२ रोजी फिर्यादी राऊळ यांच्या ओळखीचे व्यक्ती, संचालक व साक्षीदार यांना जीवे मारण्याचा व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमया दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.