शहरासह जिल्ह्यातील कत्तलखाने भुईसपाट करा अन्यथा गोरक्षक व वारकरी रस्त्यावर उतरणार

0
21

नगर- नगर शहरातील व जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने त्वरीत भुईसपाट करण्यात यावे. शहरातील झेंडीगेट, नेवासा, श्रीरामपूर, ममदापूर येथे कत्तलखाने कार्यरत असून त्यावर कारवाई न झाल्यास गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिला आहे. या संदर्भात पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना देखील काही समाजकटंक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे. सहा ठिकाणी पोलिस स्टेशनकडून व एल.सी.बी.च्या पथकाकडून अनेकदा कायदेशीर कारवाई करण्यात आल्या आहेत. तरी देखील त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही. ते कसाई नेहमी राजरोसपणे हजारो गोवंशाची कत्तल करत आहे. त्यांना प्रशासनाची भिती वाटत नाही, हे दुर्दैव आहे. तरी सर्व ठिकाणचे कत्तलखाने त्वरीत भुईसपाट करण्यात यावे जर असे झाले नाही तर न्यायदेवताकडे न्याय मागू व महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावरती उतरून आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा भंडारी यांनी दिला आहे. यावेळी ऋषिकेश भागवत, साहिल पवार, सनी थोरात, शिवराज पवार, ऋषिकेश जुम्मीवाले, सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.