बहुजन समाज पार्टीची शहरातून मोटारसायकल प्रचार रॅली

0
32

नगर – बहुजन समाज पार्टीचे नगर दक्षिण लोकसभाचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन चौका-चौकातून प्रचार रॅलीचे मार्गक्रमण झाले. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोटारसायकल रॅलीचे प्रारंभ झाले. यामध्ये उमेदवार उमाशंकर यादव, बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, महिला जिल्हाध्यक्षा अणुरिता झगडे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, छोटेलाल यादव, रामजीत यादव, प्रतिक जाधव, समाशंकर यादव, अब्दुल राजीक, उदयप्रताप यादव, महेश यादव, ओमप्रकाश ठाकूर, किशनकांत यादव, जयसिंग यादव, ओम ठाकूर, मनीषा जाधव, श्याम सिंग, रवी यादव, आयुष यादव, अजित यादव, विक्रम यादव, आकाश तिवारी, राहुल यादव आदी उपस्थित होते. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीचे सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सांगता झाली.

या मोटारसायकल रॅलीत बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते. उमाशंकर यादव म्हणाले की, सत्ताधारी व विरोधक सत्ता वाटून घेऊन लोकांना वेड्यात काढत आहे. सर्वसामान्यांचे आजही प्रश्न सुटलेले नाही. युवकांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार फक्त खोट्या घोषणा करुन जुमलेबाजी करत असून, जिरवा-जिरवीच्या राजकारणापलीकडे विकासाशी त्यांचे देणय्घेण नाही. अशा प्रस्थापितांविरोधात बसपा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. सर्वसामान्य जनतेनी जागृक होऊन एकदा तरी सर्वसामान्य उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.