खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात घुसून दमबाजी करत सोन्याची चेन पळविली

0
36

नगर – सोन्याची चेन खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात आलेल्या एकाने १ लाख ५१ हजार रुपये किमतीची २ तोळे वजनाची सोन्याची चेन गळ्यात घालून सराफाला दमबाजी करत ती पळवून नेल्याची घटना खरवंडी कासार (ता. पाथर्डी) गावातील चिंतामणी ज्वेलर्स या दुकानात घडली. याबाबत सराफ व्यावसायिक मुकुंद चंद्रकांत चिंतामणी (रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) यांनी गुरुवारी (दि.१८) रात्री पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, सोमवारी (दि.१५) सकाळी १०.३८ च्या सुमारास रवि पोपट घुले (रा. काटेवाडी, ता. पाथर्डी) या नावाचा इसम दुकानात आला, त्याने सोन्याची चेन दाखविण्याची मागणी केली. त्यावेळी सराफ व्यावसायिक मुकुंद चिंतामणी यांनी त्यास लाख ५१ हजार रुपये किमतीची २ तोळे वजनाची सोन्याची चेन दाखविली. ती घेवून त्याने गळ्यात घातली आणि आरशात कशी दिसतेय असे पाहिले व तो तेथून पैसे न देताच निघून गेला. फिर्यादी चिंतामणी यांनी त्यास हाक मारली मात्र तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने त्यास फोन करून सोन्याची चेन अथवा पैसे देण्याची मागणी केली असता नाही देणार तुला काय करायचे ते कर, तु या गावात कसा राहतो ते मी बघतोच अशी धमकी दिली. वारंवार फोन करूनही आरोपीने सोन्याची चेन अथवा पैसे न दिल्याने चिंतामणी यांनी पाथर्डी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी घुले विरुद्ध भा.दं.वि. कलम ३८०, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.