गोरक्षनाथ गडावरील मंदिरातील दानपेटी फोडली; रोकड लंपास

0
51

गोरक्षनाथ गडावरील मंदिरात असलेली दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.१३) रात्री ९ ते रविवारी (दि.१४) पहाटे ५ या कालावधीत घडली आहे. याबाबत गोरक्षनाथ गडाच्या मंदिराचे व्यवस्थापक विक्रम नामदेव कदम यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरील मंदिरात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत मंदिरातील गाभार्‍या समोर ठेवलेली लोखंडी दानपेटी फोडून त्यातील सुमारे २५ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी पहाटे ५ च्या सुमारास निदर्शनास आली. त्यानंतर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, पोलिस उपनिरीक्षक मोंढे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत व्यवस्थापक विक्रम कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भा.दं. वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला.