नगर पुणे कनेक्टीव्हीटी वाढण्यास मदत होईल : अशोक कानडे

0
18

नगरचे रेल्वे स्थानकाचा कारभार आजपासून पुणे विभागातून सुरू

नगर – नगरचे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक असे आहे. सर्वात जुने असलेले हे स्थानक १८७८ साली सुरु करण्यात आले होते. त्यानंतर कालातंराने रेल्वे स्थानक सोलापूर विभागाशी जोडण्यात आले. परंतु अहमदनगर ते सोलापूर हे आठ तासांचे अंतर असल्याने दळणवळण, प्रशासकीय कामकाज, व रेल्वे संदर्भातील काम करणे याकरीता अडचणीचे होते. त्यामुळे दिव्यांग, ग्रुप बुकींग, पासेस या कामासाठी प्रवाशांना सोलापूर येथे जावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत प्रवासी संघटनेच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा करुन नगरचा रेल्वे विभाग पुण्यास जोडण्यात यावा, ही मागणी सातत्याने केली जात होती. आज ती पूर्ण झाल्याचे समाधान आहे. यामुळे वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचणारच आहे, त्याचबरोबर नगर-पुणे कनेटीव्हीटी वाढण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन रेल्वे सल्लागार समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी केले. १ एप्रिल पासून अहमदनगर रेल्वे स्थानक पुणे विभागाशी जोडण्यात आले. त्याबाबतच्या फलकाचे अनावरण नगर रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आले.

याप्रसंगी रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एम.पी.तोमर, रेल्वे सल्लागार समितीचे हरजितसिंग वधवा, अशोकराव कानडे, विलास महाजन, अनिल सबलोक, बाळासाहेब गायकवाड, सौ.कविता तागडे, सुहास पाथरकर, संदेश रपारिया, सुधीर महाजन, प्रमोद वारे उपस्थित होते. यावेळी हरजितसिंग वधवा म्हणाले, नगर रेल्वे पुणे विभागात आल्याने सर्वांसाठी मोठी सोयीचे झाले आहे. यासाठी प्रवासी संघटना, सल्लागार समितीचा नेहमीच पाठपुरावा राहिला आहे. त्याचबरोबरच नगर-पुणे लोकल किंवा इंटरसिटी रेल्वे सुरु होण्याच्या मागणीला नक्कीच गती मिळेल. या प्रक्रियेसाठी अधिकारी वर्गाचेही मोठे सहकार्य मिळाल्याने हे शय झाल्याचे सांगितले. याप्रसंगी एम.पी.तोमर म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पुर्ण झाली आहे, आता पुण्याशी नगर रेल्वे स्थानक जोडले गेल्याने प्रशासकीय कामकाजाबरोबरच प्रवाशांचीही मोठी सोय होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सबलोक यांनी केले तर आभार बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.