पोलिओने पाय लुळा का होतो?

0
48

पोलिओने पाय लुळा का होतो?

पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची, विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात. पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बर्‍याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत शिरतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते. रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेशन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शयता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषतः पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेशन देऊ नये. पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते. पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.