अँटीबायोटीस म्हणजे काय?

0
60

अँटीबायोटीस म्हणजे काय?

अँटीबायोटीस अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉटर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. अलेझांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळी ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत, कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात. जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमायसीन, सेफॅलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी वावडे वा अ‍ॅलर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्या जाणार्‍या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.