कुचल्याच्या बियांची पावडर जखमेवर लावावी का?
कुचला ही एक विषारी वनस्पती आहे. इंग्रजीत तिला स्ट्रिनॉस नस व्होमिका असे म्हणतात. पिकलेल्या फळातील बिया विषारी असतात. दोन सें. मी. व्यास व अर्धा सें. मी. जाडी असलेल्या या बिया करड्या रंगाच्या असतात व त्यांच्यावर लव असते. या बियांमध्ये स्ट्रीच्नीन, ब्रूसनीन व लोगॅनीन हे घटक असतात. स्ट्रीच्नीनमुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या सर्व भागांच्या कामाला उत्तेजना मिळते. मेंदूतील काही पेशी उत्तेजित झाल्याने शरीरातील स्नायूंची प्रतिसाद देण्याची तीव्रता खूपच वाढते. साहजिकच ध्वनी, उजेड, हवेची झुळूक अशा गोष्टींमुळेही रुग्णाला झटके येतात. कुचल्याच्या बिया खाल्ल्याने (म्हणजे कवचासहित गिळल्याने) त्यांचे पचन न झाल्याने काहीही परिणाम होत नाही. याउलट जर बियांचे तुकडे खाल्ले वा बिया चावून खाल्ल्या, तर अत्यंत कडवट चव लागते. १५ मिनिटांतच विषबाधेची लक्षणे दिसून येतात. रुग्ण अस्वस्थ होतो. त्याचे स्नायू कडक होतात. त्यानंतर या विषबाधेतील विशिष्ट प्रकारचे झटके येऊ लागतात. श्वसन करता न आल्याने शरीर काळेनिळे होते. अत्यंत वेदनामय रीतीने मृत्यू येतो. जखमेवर कुचल्यांच्या बियांची भुकटी लागल्याने एखाद्यावेळी स्ट्रीच्नीन हे विष शरीरात शोषले जाऊ शकते. शोषल्या गेलेल्या विषाचे प्रमाण जास्त असल्यास विषबाधाही होऊ शकते. तसेच कुचल्याच्या बियांची भुकटी जखमेला लावल्याने जखम भरून यायला काही मदत होत नाही. रक्तस्राव थांबण्यास थोडी मदत होऊ शकेल; पण या कामासाठी अत्यंत परिणामकारक अशी आधुनिक औषधे उपलब्ध असल्याने कुचल्याच्या बियांच्या भुकटीसारख्या विषारी पदार्थांचा वापर करणे केवळ अयोग्यच नव्हे, तर धोकादायकही आहे.