नगर – शिवजयंती निमित्त सोमवारी (दि.१९) सायंकाळी शहरातून काढलेल्या मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत डीजेचा दणदणाट केल्याने २ मंडळाचे अध्यक्ष व २ डीजे मालक अशा चौघांवर बुधवारी (दि.२१) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पो.हे.कॉ. मच्छिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली आहे. या मध्ये म्हंटले आहे की शहरातील पैलवान प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव या दोन मंडळांना सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर मिरवणुकीत डीजे लावण्यास परवानगी दिली होती. मात्र या दोन्ही मंडळांनी या आदेशाचा भंग करत मोठ्या आवाजात डीजे वाजवले. त्यामुळे पैलवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा लाळगे व डीजे मालक सागर गोसावी (सोलापूर) तसेच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव या मंडळाचे अध्यक्ष शुभम सुडके व डीजे मालक अन्वर शेख (पिंपळे गुरव, पुणे) अशा चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.