अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने २ ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
51

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले; कल्याण रोड व निंबळक रोडवरील घटना

नगर – रस्त्यांने दुचाकीवर चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याच्या २ घटना रविवारी (दि.१७) दुपारी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने घडल्या आहेत. एक घटना दुपारी ३ च्या सुमारास नगर कल्याण रोडवर निमगाव वाघा शिवारात असलेल्या एका मंगल कार्यालयासमोर तर दुसरी घटना दुपारी ३.३० च्या सुमारास निमगाव घाणा ते निंबळक रोडवर घडली आहे.

याबाबत नगर तालुका आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या घटनेची फिर्याद सौ. शारदा चंद्रशेखर केदार (वय ४९, रा. द्वारका कॉम्ल्पेस, नायरा पेट ्रोलपंप समोर, बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. फिर्यादी यांच्या नातेवाईकांचे ल३/४ निमगाव वाघा रविवारी दुपारी होते. त्यामुळे त्या व त्यांचे पती त्यांचे ज्युपिटर मोपेडवर नगर ते कल्याण रोडने दुपारी ३ च्या सुमारास आशिर्वाद लॉन ते निमगाव वाघा रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागुन दोन अनोळखी इसम काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर आले व त्यांनी मोपेडवर पाठीमागे बसलेल्या फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, दीड तोळे वजनाचा राणीहार, अर्धा तोळा वजनाचे मंगळसुत्र असे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेवून गेले.

दुसरी घटना त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने दुपारी ३.३० च्या सुमारास निमगाव घाणा ते निंबळक रोडवर घडली. फिर्यादी दत्तात्रय मुठे (रा.निंबळक, ता.नगर) हे, त्यांची सून आणि नातीसोबत मोटारसायकलवर जात असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात मोटारसायकलवर आलेल्या २ चोरट्यांनी त्यांच्या सुनेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसका मारून तोडले आणि मोटारसायकलला लाथ मारली. त्यामुळे फिर्यादी मुठे व त्यांची सून, नात हे खाली पडून जखमी झाले. या चोरट्यांनी दागिने घेवून तेथून पोबारा केला. याबाबत मुठे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.