अनशा पोटी चहा घेताय?

0
149

अनेक लोकांची दिवसाची सुरुवात चहानेच होत असते. काही लोकांना तर डोळे उघडताच पलंगावरच ‘बेड टी’ हवा असतो. ही सवय झोप घालवण्यासाठी मदत करीत असली तरी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी चहा पिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चहा आणि कॉफीमध्ये नैसर्गिकरीत्याच आम्लियता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्याने आम्लाचे मूळ संतुलन बिघडू शकते व त्यामुळे पित्ताचा तसेच अपचनाचा त्रास उद्भवू शकतो. चहामध्ये ‘थियोफिलाईन’ नावाचाही एक घटक असतो. त्याच्यामुळे निर्जलीकरण होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. तसेच दात न घासताच चहा पिण्याच्या सवयीने जीवाणू तोंडात साखरेचे विघटन करू शकतात व तोंडात आम्लाचा स्तर वाढू शकतो. त्यामुळे दातांमधील इनॅमलचा र्हास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक कप कोमट पाण्यात लिंबूचा रस आणि काळ्या मिरीची पूड टाकून पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. वजन घटवण्यासाठी हा चांगला उपाय आहे तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.