राजाचे डोळे उघडले

0
48

त्या देशाचा राजा भयंकर अत्याचारी आणि जुलमी स्वभावाचा होता. श्रीमंतांना जबरदस्ती करून तो लुटीत असे, गरिबांना जिणे नकोसे करून सोडी, त्यामुळे राज्यातील जनता अगदी वैतागून गेली होती. ‘देवा, राजाच्या जाचातून सोडव,’ अशी ती परमेश्‍वराची प्रार्थना करीत असे. मात्र एके दिवशी चमत्कार व्हावा, तसे झाले. राजा शिकारीहून राजवाड्यात परतला, तसे त्याने दवंडी पिटून सर्व प्रजेला राजवाड्यात बोलवून सांगितले, ‘‘प्रजाजनहो, आजपर्यंत मी तुम्हाला फार छळले. तुमच्यावर जुलूम-जबरदस्ती करून भंडावून सोडले. मी तुमच्याशी फार अन्यायाने वागलो. ही माझी चूक झाली. परंतू आजपासून मी तुमच्यावर कसलाही अत्याचार करणार नाही. तुम्हाला सुखासमाधानात आनंदी ठेवीन.’’ राजाचे हे बोलणे ऐकून प्रजेला फारच आनंद झाला. राजा इतका बदलला की, लोक त्याला न्यायी, प्रजाहितदक्ष, वैभवशाली राजा मानू लागले. एकदा राजा खुषीत येऊन गप्पा मारीत असता प्रधान म्हणाला, ‘‘महाराज, आपण एकाएकी एवढे कसे बदललात?‘’ तेव्हा राजा म्हणाला, ‘‘प्रधानजी, तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी मी कोणाला न सांगता शिकारीला गेलो होतो. मी एका कोल्ह्याच्या मागावर असता एका कुत्र्याने कोल्ह्याचा लचका तोडला, पण तेवढ्यात कोल्हा बिळात शिरला असे मला दिसले. तो कुत्रा मग तसाच पुढे निघाला असता समोरून येणार्‍या लांडग्याने त्याचे नरडे फोडून त्याला ओढीत चालवले. तोच समोरून एक भरधाव घोडा आला आणि त्याने लांडग्याला एक सणसणीत लाथ हाणताच लांडगा जागेवरच मरुन पडला. घोडा तसाच पुढे निघाला असता समोरून आलेल्या सिंहाने त्याच्या डोक्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. सिंह त्याच्यावर ताव मारीत असता कुठून तरी एक बाण सूं सूं करत आला आणि गचकन सिंहाच्या मानेत रुतला. या सर्व घटना पाहून माझे डोळे उघडले. मनाशी विचार केला, वाईट कृत्यांची फळं वाईटच मिळतात, हेच खरं. मग मी पुढे गेलोच नाही. तसाच माघारी फिरलो आणि मनाशी निश्‍चय केला की आजपासून कोणावरही अन्याय करायचा नाही. प्रजेचे जेवढे भले करता येईल, तेवढे करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा.’’

तात्पर्य – आपले वर्तन जर चांगले असेल तर लोकही आपल्याशी चांगले वागतात.