नगर – महानगरपालिकेने मंगळवारी बाजारपेठेत
अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बुधवारी सुटी असल्याने
गुरुवारी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. माणिक चौक
परिसरात रस्त्यावर व्यवसाय थाटणार्या अतिक्रमणधारकांचे
साहित्य जप्त करून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड
आकारण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार
असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी
सांगितले.
बाजारपेठेसह संपूर्ण शहरात महापालिकेने अतिक्रमणांवर
कारवाईचे नियोजन केले आहे. मंगळवारी दिवसभरात केलेल्या
कारवाईत अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले. भिंगारवाला
चौक ते तेलीखुंट चौक या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या
२० पेक्षा जास्त विक्रेत्यांचे साहित्य, कपड्याचे गठ्ठे, जाहिरात फलक,
दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. शहाजी
रोडवरील सारडा गल्ली कॉर्नर ते पोखरणा ज्वेलर्सपर्यंत रस्त्याच्या
मधोमध उभ्या असलेल्या ४० ते ५० हातगाड्यावर कारवाई सुरू
होताच विक्रेते गाड्या घेऊन जिथे जागा मिळेल, तेथे पळाले.
त्यातील अनेकांच्या गाड्या, साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच, सारडा गल्ली ते मोहन ट्रंक डेपोपर्यंत रस्त्यावर १५
व्यवसायिक, दुकानदारांनी लोखंडी स्टूल, टेबल व जाळ्या
टाकून अतिक्रमण केले होते. त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात
आले. मोची गल्ली, गंज बाजार व सराफ बाजारांमधील ५०
पेक्षा जास्त हातगाडीधारक, पथविक्रेते यांचे साहित्य, टेबल,
ताडपत्री, बांबू, जाहिरात फलक, गाड्या जप्त करण्यात आल्या.
गुरुवारीही या भागात पथक गस्त घालत होते. त्यानंतर
पथकाने माणिक चौक परिसरात मोर्चा वळवला. तेथे रस्त्यावर
अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक, विक्रेत्यांवर कारवाई करून
त्यांचे साहित्य, गाड्या जप्त केल्या. तसेच, प्रत्येकी दोन हजार
रुपये दंड करण्यात आला. मनपाने सुरू केलेली मोहीम थांबणार
नसून, सर्व भागात कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे.
रस्त्यावर कोणीही एकच जागी थांबून किंवा रस्त्याला अडथळा
होईल या पद्धतीने व्यवसाय करून अतिक्रमण करू नये, अन्यथा
कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही, असा
इशारा त्यांनी दिला आहे.
अहिल्यानगर शहरात गुरुवारीही मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम माणिक चौकात रस्त्यावर व्यवसाय थाटणार्यांना दोन हजारांचा दंड
पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करुन लसीकरण
मुक्या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य : संजय गुगळे यांचे प्रतिपादन
नगर – जागतिक पाळीव प्राणी दिवसनिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना
रोग प्रतिबंधक (अॅन्टी रेबीज), धनुर्वातचे लसीकरण करुन जंत प्रतिबंधक मोफत औषधे देण्यात
आले. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या संयुक्त
विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील पशुपालकांचा सहभाग लाभला. जुने बसस्थानक येथील
जिल्हा पशु सर्व चिकित्सालय येथे पार पडलेल्या शिबिराप्रसंगी जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे
स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जि.प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशु सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे आदी उपस्थित
होते. संजय गुगळे म्हणाले की, पशुसेवा ही ईश्वरसेवा आहे. मुया प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य
आहे. पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात. त्यांचे दुःख वेदना समजून पशुचिकित्सक
त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार करत आहे. जायंट्स ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध सामाजिक
उपक्रमाची माहिती देवून, जनावरांसाठी सातत्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात असल्याचे
सांगितले. डॉ. सुनील तुंबारे यांनी प्राण्यांपासून निर्माण झालेल्या बहुतांश गंभीर आजारावर उपाय नाही. यासाठी
पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जंगले नष्ट करुन वाढलेल्या शहरीकरणामुळे मानव
आणि प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. मानव, पाळीव आणि वन्य प्राणी, वनस्पती आणि व्यापक वातावरण
यांचे आरोग्य जवळून जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून आहे. ही घडी विस्कटली जात असताना
मानवाला यामध्ये पुढाकार घेऊन समतोल साधण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात घोडे, कुत्रे, गाई, म्हशी, मांजर, शेळ्या आदी ११० पाळीव प्राण्यांची आरोग्य
तपासणी करुन उपचार करण्यात आले. तसेच गरजेनुसार मोफत औषधही वितरीत करण्यात आले.
शिबीरासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, डॉ. ज्ञानेश्वर काळे, तुषार घुले,
कार्तिक शिंगटे, गणेश गव्हाणे, विशाल ढगे, गडाख, शुभम, गीते, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया,
सचिव अमित मुनोत, अध्यक्ष पूजा पातुरकर, अजय मेडिकलचे दर्शन गुगळे, गोमटी चौधरी, अनुज चंगेडिया
यांचे सहकार्य लाभले. पाळीव प्राण्यांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अजय मेडिकलच्यावतीने
पशुपालकांना मोफत औषध उपलब्ध करुन देण्यातआले होते.
‘बालघरा’तील मुलांना साहित्याचे वाटप व शिव भोजन
जगदंब युवक फाऊंडेशनचे वतीने एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी
नगर – पाईपलाईन रोड येथे जगदंब युवक फाऊंडेशन तर्फे बालघर प्रकल्पातील निराधार बालकांसमवेत
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. मुलांनी शाहिरी, पोवाडे व शिव
कथेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा महिमा सांगितला. यावेळी मुलांना शालेय साहित्याचे वाटप
व मिष्ठान्न शिवभोजन देण्यात आले. याप्रसंगी संचालक युवराज गुंड, जगदंब युवक फाऊंडेशनचे डॉ.ऋषी निर्मळ
पाटिल, अक्षय जाधव, गणेश वांढेकर, स्वप्निल मेहरकर, माऊली अडसुरे, अविनाश
शेटे, समर्थ गुंड, मल्हारी चव्हान, प्रमोद दहातोंडे, शुभम जगताप,
गणेश पवार, अक्षय कोलते, लखन बेरड, जयराज सायबर, हिमालय
शेवाळे, विक्रम दारुडे, स्वप्निल वाघमारे उपस्थित होते.
डॉ.ऋषी निर्मळ पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. महाराष्ट्रातील प्रजा
सुखी राहावी जनतेचे राज्य यावे यासाठी स्वराज्याची स्थापना केली.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पराक्रमाचा प्रेरणादायी इतिहासाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी.
यासाठी फाउंडेशनच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानेच कृती करायला हवी
श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री मार्कंडेय देवस्थानच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले
नगर – सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिन सालाबाद प्रमाणे
श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान, गांधी मैदान, अहमदनगर येथे उत्साहात
साजरा करण्यात आला. प्रकट दिन निमित्त सायंकाळी ५ वाजता श्रीं चे
पूजन करण्यात आले. तदनंतर श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळाचा
भजनांचा कार्यक्रम सायंकाळी ७:३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता
महाप्रसादाचे वाटप, संध्या. ८:३० ते रात्री १० वा. भजन संध्याने प्रकट
दिन साजरा झाला.
श्री मार्कंडेय देवस्थानच्यावतीने भाविकांसाठी लापशी, पिठल, भात,
ठेचा आदी महाप्रसाद वाटप करण्यात आले. याचा ३ हजाराच्या जवळपास
भाविक भक्तांनी लाभ घेतला तसेच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी
गर्दी केली होती. श्री मार्कंडेय देवस्थान आवारा मधील श्री गजानन महाराज
मंदिरास आकर्षक फुलांची सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे
मंदिरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.
श्री मार्कंडेय देवस्थान च्या वतीने दरवर्षी श्री सद्गुरु गजानन महाराज
प्रकट दिनानिमित्त महाप्रसादासाठी सहकार्य करणार्या सर्व भाविक भक्तांचे
देवस्थानचे उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल यांनी आभार व्यक्त केले. तसेच
वर्षभरात विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन श्री मार्कंडेय देवस्थानच्या
वतीने केले जाते, त्यात श्री मार्कंडेय जयंती, श्री गणेश जयंती, महाशिवरात्री
उत्सव,श्रीराम नवमी, श्री हनुमान जयंती, श्री दत्त जयंती, धर्मनाथबीज
उत्सव, श्री गजानन महाराज प्रकट दिन, आषाढी एकादशी उत्सव, नारळी
पौर्णिमा उत्सव, रक्षाबंधन उत्सव, या उत्सवांच्या माध्यमातून अनेक
धार्मिक सामाजिक उपक्रम वर्षभर देवस्थानच्या वतीने राबविण्यात येत
असल्याची माहिती देवस्थानचे ज्ञानेश्वर मंगलारम यांनी दिली.
श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव यशस्वीतेसाठी देवस्थानचे सर्व
पदाधिकारी व श्री मार्कंडेय मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य, कुमार आडेप, वाय
प्रकाश टेलर, रघुनाथ गाजेंगी, दत्तात्रय जोग, रमाकांत बिज्जा, गणेश आकेन,
विनायक बत्तीन, शिवाजी संदुपटला, सागर सब्बन, शंकर नक्का, अंबादास
चाटला, अंबादास रच्चा, अजय गुरुड, रमेश कोंडा, श्रीनिवास वंगारी,
हनुमान म्याकल, शंकर मुत्याल, व्यंकटेश नक्का, प्रमोद अंकम, शुभम
सुंकी, श्रीनिवास एलाराम, श्रीनिवास बुरगुल, विजय मच्चा, बालकिसन
आकूल, दिलीप गटने, श्रीनिवास श्रीगादी, शेखर दिकोंडा, नितीन कामुनी
आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टोयोटो ‘कॅम्री’चे नगर येथील ‘वासन’ मध्ये अनावरण
वासन टोयोटात नवव्या जनरेशनच्या कॅम्रीचे या कारचे अनावरण करताना माजी आमदार अरुण जगताप आदी.
नगर – केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये अद्यावत हायब्रिड तंत्रज्ञानासह सोयी-सुविधांनी युक्त आणि लझरी सेडान असलेल्या कॅम्री या कारचे अनावरण माजी आमदार अरुण जगताप
यांच्या हस्ते झाले. कॅम्री ही लझरी सेडान असून, अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान व लझरी सुविधांचा समावेश केला आहे. स्टायलिंगपासून ते परफॉर्मन्सपर्यंत, या गाडीने बाजारात एक वेगळाच मानक प्रस्थापित केला आहे. अनावरण
प्रसंगी चंद्रकांत गाडे, रविंद्र बक्षी, सुनील मुथ्था, अनिल बट, हरजीतसिंह वधवा, प्रितपालसिंह
धुप्पड, वासन टोयोटा शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, अॅड. सुरेश
ठोकळ, मनमीत सलूजा, राजेंद्र कंत्रोड, मुन्ना जग्गी, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, राजेंद्र
ससे, गणेश औटी, चिंटू गंभीर, कैलाश नवलानी, अर्जुन मदान, सुनील थोरात, डॉ. अनिल आठरे
आदी उपस्थित होते. कॅम्रीच्या नवीन मॉडेलमध्ये आकर्षक वाय-आकाराचे फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स
आणि स्लीक कव्हर्स देण्यात आले आहेत. १८- इंच अलॉय व्हील्स आणि क्रोम फिनिश असलेले
डिटेल्स गाडीला अधिक आकर्षक बनवतात. इंटीरियरमध्ये प्रीमियम मटेरिअलचा वापर
करण्यात आला आहे. नवी ड्युअल-टोन थीम, व्हेंटिलेटेड लेदर सीट्स आणि वुडन फिनिशिंग,
२.५-लिटरचे पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे १७८ बीएचपी पॉवर आणि २२१
एनएम टॉर्क जनरेट करते. नवीन मॉडेलमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर विशेष भर देण्यात आला
आहे. सरासरी २२-२४ किमी प्रतिलिटरची मायलेज आहे. ई-सीव्हीटी ट्रान्समिशन गाडीला
अधिक स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करत असल्याची माहिती अनिश आहुजा व मनमीत
सलूजा यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. ही कार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुममध्ये
उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी शक्तींनी एकत्र येणे काळाची गरज
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी अभिवादन
नगर – उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले शहीद कॉम्रड गोविंद पानसरे यांच्या
दहाव्या स्मृतिदिनी शहरातील बुरुडगाव रोड वरील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात आयोजित अभिवादन
सभेत प्राचार्य शितोळे बोलत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अॅड सुभाष,
जिल्हा सहसेक्रेटरी कॉ. अॅड सुधिर टोकेकर, भारती न्यालपेल्ली, कॉ. श्रीधर आदिक, कॉ. भाऊसाहेब
थोटे, आप्पासाहेब वाबळे, भगवानराव गायकवाड, फिरोज शेख, लक्ष्मण नवले, सतिश पवार, सुलाबाई आदमाने, बेबीनंदा
लांडे, ज्ञानदेव गायकवाड, संगीता कोंडा, अफसाना शेख, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य शितोळे
पुढे म्हणाले की, कॉम्रेड पानसरे यांनी राजकारण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात पुरोगामी विचारांसाठी मोठे योगदान दिले
आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा
इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
नावाने साहित्य संमेलने भरवून आण्णाभाऊ एका जातीचे नसून ते सर्व कामगार, शेतकरी
व उपेक्षित वंचित घटकांचा आवाज होते. म्हणूनच त्यांची देशात व परदेशात ही ख्याती
होती, कॉम्रेड पानसरे हे सर्व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळींचे मार्गदर्शक होते, असे त्यांनी सांगितले.
कॉ. सुभाष लांडे यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकर्यांना जामीन मंजूर होतो, मात्र अद्यापि शिक्षा होत नसल्याची खंत व्यक्त केली. मंजूर केलेला जामीन रद्द व्हावा, यासाठी राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात जामीन रद्द
होण्यासाठी अपील करण्याची मागणी त्यांनी केली. उपस्थित मान्यवरांनी कॉम्रेड पानसरे
यांच्या जीवनातील कार्य व विचारांवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. कॉ.अॅड. सुधीर
टोकेकर यांनी आभार मानले.
नीती भ्रष्टांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनता वैतागली
अरुण खिची यांचे प्रतिपादन; शासन-प्रशासनातील सत्यमेव जयते! ब्रिद वायाच्या उलट कार्याने केडगावला पार पडली निषेध सभा
नगर – शासन प्रणालीत त्यांच्या ब्रिद वायाप्रमाणे वागण्याची
गरज निर्माण झाली आहे. शासन-प्रशासनामध्ये कोणालाच कोणाचे
तालमेल राहिलेले नाही. वास्तविक पाहता गेल्या वीस वर्षाच्या
लोकशाहीत एक न धड भारभर चिंध्या, अशी परिस्थिती निर्माण
झाली आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढला आहे. नीती
भ्रष्टांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनता वैतागली आहे. प्रस्थापित
ब्रीदवाय ही वेशीला टांगलेल्या फलकाप्रमाणे शासकीय कार्यालयात
दिसून येतात. संविधानिक घटनेतील नागरिकांचे हक्क, कर्तव्य
बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचा आरोप अरुणोदय क्रांती सेवा
संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची यांनी केला.
शासन प्रणालीत सत्यमेव जयते! हे ब्रिद वाय फक्त नावालाच
उरले असताना, या ब्रिद वायाचा उलट पध्दतीने सर्वसामान्य
नागरिकांना अनुभव येत असल्याचा आरोप करत अरुणोदय
क्रांतीसेवा संघाच्या वतीने केडगावला निषेध सभा पार पडली.
यामध्ये राज्यातील शासन प्रणालीतील सर्वच ब्रिद वायांचा उपयोग
फक्त दाखवण्यासाठी शिल्लक उरल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
अरुण खिची यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केडगाव, एकनाथनगर
येथील विठ्ठल पार्क येथे बैठक पार पडली. यावेळी दक्षता कमिटीच्या
नलिनी गायकवाड, शांतता कमिटीचे सदस्य जंगम देवा, रावसाहेब
कांबळे, सुनिता खिची, नयना चायल, दुर्गा सोलीवाल, अक्षय मतकर
आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भारतीय लोकशाहीत प्रमुख असलेले सत्यमेव जयते! हे ब्रीद
वाय अमलात येत नाही. हे ब्रीदवाय कशासाठी आहे, याची जाणीव
सर्वसामान्यांना प्रशासनाच्या कार्यातून होत नाही. या भारत देशाचा
पूर्व इतिहास पाहता नेहमी नीतीचा व सत्याचा विजय होत आला
आहे. पुन्हा सत्याची बाजू निर्माण होण्यासाठी व सत्यमेव जयते!
हे ब्रिद वाय खर्या पध्दतीने अमलात आणण्यासाठी अरुणोदय
क्रांतीसेवा संघाने चळवळ चालवली असल्याची माहिती खिची यांनी
दिली.
नागरिकांमध्ये त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव करुन देऊन
सत्यमेव जयते! हे ब्रीदवाय शासनाकडून अमलात आणण्यासाठी
संघटनेने पुढाकार घेतला आहे. या सभेमध्ये विविध कायदे विषयी
प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तर यापुढील काळामध्ये सत्यमेव
जयते! या ब्रिदवायाचे योग्य वापर होण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे
जन आंदोलन करण्याचा व यापुढील जाहीर निषेध सभा रस्त्यावर
घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनपा उपायुक्तांसह अधिकार्यांनी केली सिव्हिल हडको येथील ओढ्याची पाहणी
नागरिकांनी उपायुक्तांसमोर वाचला विविध प्रश्नांचा पाढा : मैलामिश्रित पाणी सोडणार्यांवर दिले कारवाई निर्देश
नगर – सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैलामि श्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास
धोका निर्माण झाला असताना मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे, शहर अभियंता मनोज पारखे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी २० फेब्रुवारी ओढ्यासह सदर परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी
उपायुक्तांसमोर आरोग्यासह विविध प्रश्नांचा पाढा वाचला. याप्रसंगी प्रशांत सराईकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद
लहामगे, राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, राजेंद्र कचरे, काका शेळके, शिवम देवगुणे, राहुल दरेकर, अक्षय सूर्यवंशी, मोहित गाडे, अमित कचरे, अनंत पालवे, राजेंद्र कांबळे, अशोक मुळे, अशोक कर्डिले, धनराज
सोनवणे, अरुण सीतापुरे, गिरीश चोथे, उमेश पाठक आदींसह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित
होत्या. मनपा उपायुक्तांसह आलेल्या अधिकार्यांनी सिव्हिल हडकोमधील गणेश चौक, गायकवाड कॉलनी,
भारत चौक परिसराची पहाणी केली. यावेळी नागरिकांनी रस्ता काँक्रिटीकरण झालेल्या
कामाच्या तक्रारी, वेळेवर सफाई न होणे व गणेश चौकातील रस्त्याचे संथ गतीने सुरु असलेल्या कामाची
तक्रार केली. उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी संबंधित विभागातील अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ
नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे सूचना केल्या. तर सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैलामिश्रित
पाणी कोणालाही सोडता येणार नसल्याचे स्पष्ट करुन, मैलामिश्रित पाणी सोडणार्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी
निर्देश दिले. सावेडीमधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैलामिश्रित पाणी
सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
डेंगूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार
पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात आले असून,
सर्वत्र दुर्गंधी देखील पसरल्याने व नळाद्वारे देखील दुषित पाणी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी
दोन दिवसापूर्वी उपायुक्त मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. नागरिकांच्या तक्रारीची
तात्काळ दखल घेऊन मनपा प्रशासनाच्यावतीने उपायुक्तांनी सदर परिसराची संबंधित अधिकार्यांसह
पहाणी केली. तातडीने नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल नागरिकांच्यावतीने मनपा
प्रशासनाचे आभार मानण्यात आले. नागरिकांच्या तक्रारीनंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे
व शहर अभियंता मनोज पारखे यांनी दखल घेऊन सदर प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे.
सिव्हिल हडको परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना, या भागात साथीचे आजार पसरत
आहे. यासंबंधी मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा
उपाध्यक्ष आनंद लहामगे म्हणाले.
केडगावात शिवजयंतीनिमित्त शिवदिंडी, चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष
केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली.
नगर – केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणुक रंगली होती. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ,
सईबाई, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता अशी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.आकर्षक पध्दतीने शिवरायांची पालखी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. ज्ञानसाधना गुरुकुल लास ते मोहिनीनगर असा दिंडीचा मार्ग होता. यावेळी केडगाव येथील ग्रामस्थांनी मिरवणुकीच्या वेळी ठिकठिकाणी छत्रपतींच्या पालखीचे स्वागत केले. साईसेवा मंडळ व महिला मंडळ यांच्यावतीने शिवरायांच्या पालखीचे पूजन करून महाआरती करण्यात
आली. मिरवणूक देवी मंदिराजवळ आली असता जगदंबा
तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप तसेच केडगाव ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात
आले.
यावेळी मनोज कोतकर म्हणाले की, ज्ञानसाधना गुरुकुलने सुरु केलेली शिवदिंडीची
संकल्पना कौतुकास्पद आहे. दरवर्षी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून तिचे स्वरूप व्यापक
होत चालले आहे. तरुण पिढीने शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आत्मसात
केले पाहिजेत. डीजे लावून नाचण्यापेक्षा पुस्तक वाचून शिवरायांचे विचार समजतील.
तरुणांनी येणार्या काळात एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
तर पारंपारिक पध्दतीने निघालेल्या या मिरवणुक
सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. शिक्षणाबरोबर
संस्कृती जोपासण्याचे व विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचे
कार्य ज्ञानसाधना गुरुकुल करत असल्याचेही ते म्हणाले.
उद्योजक सुमित लोंढे यांनी उपनगरातील या
एकमेव लासमध्ये शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृतीचे
जतन करणारे शिवजयंती सारखे विविध कार्यक्रम घेतले
जात असल्याचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना ४०० हुन
अधिक परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले.
यावेळी संभाजी पवार, उद्योजक जालिंदर कोतकर,
मुख्याध्यापक संदीप भोर, दिपक तागडे, अनिल ठुबे,
सागर वाव्हळ, काळे सर, गुलाब कोतकर, तुषार कोतकर,
नितीन ठुबे, शाहरुख शेख आदीसह ज्ञानसाधना गुरुकुलचे
सर्व शिक्षक, लंडन किड्स शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी
पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भैरू कोतकर, ढोरसकर, चेमटे, साई सेवा महिला
मंडळ, शिवाजी बोरुडे, बच्चन कोतकर मित्र मंडळ व अजित कोतकर मित्र मंडळ यांच्या
वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरी नियुक्त केले नाही, तर अहिल्यानगर मनपा आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई
नगर – अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अनुसूचित
जाती आयोग अध्यक्ष यांच्या समक्ष मुंबईत सुनावणी पार पडली. अहिल्यानगर . महापालिका .
आयुक्तांनी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरी नियुक्त केले नाही, तर शिस्तभंगाची कारवाई
करण्याचा इशारा अनुसूचित जाती आयोगाने दिला असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश
कंडारे व राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेतील न्यायालयीन
आदेशाने नियमित झालेल्या सफाई कर्मचार्यांना मागील अनेक वर्षांपासून लाड पागे समितीचे
धोरण लागू करण्याबाबतचा लढा सुरू होता. राज्य शासनाचे धोरण सफाई कामगारांना सामाजिक
संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासन
करत नव्हते. याविषयी संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.
त्या अनुषंगाने नुकतेच मुंबईत आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे
यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली. या ठिकाणी कामगारांच्या बाजूने संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश
कंडारे व राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी ठोस भूमिका मांडली. महानगरपालिका प्रशासनातर्फे
उपायुक्त डॉ. विजय मुंडे यांनी बाजू मांडली. याविषयी . नुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ व अॅड. गोरक्ष लोखंडे, सदस्य यांनी महानगरपालिका प्रशासनाला स्पष्ट असे निर्देश दिले की, ८ दिवसाच्या आत सर्व न्यायालयीन
सफाई कर्मचार्यांच्या वारसांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करावे. अन्यथा सामान्य
प्रशासन विभाग शासन निर्णय १२ जून १९९५ अंतर्गत संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला. सफाई कर्मचारी हा समुदाय अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जातीतील
असल्यामुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू होता. सफाई कर्मचारी
सेवानिवृत्त मयत झाल्यानंतर ३० दिवसात त्याच्या वारसाला नियुक्ती मिळणे बंधनकारक असताना
शासनाच्या या आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार मनपा प्रशासनतर्फे सुरू होता. शासनाकडे
अनावश्यक बाबींचे मार्गदर्शन मागवून वेळ काढू धोरण चालू होते. संघटनेने याविषयी अनुसूचित
जाती आयोगाकडे या समस्येबद्दल वाचा फोडल्याने आयोगाने मनपा प्रशासनावर ताशेरे ओढले.
आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे अहिल्यानगर महापालिकेतील शेकडो सफाई कामगारांच्या
वारसांचे प्रलंबित नियुक्ती आदेश निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे कामगार संघटनेच्या
वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.













