सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियान आयोजित ‘मी सावित्री ज्योतिराव फुले’ एकपात्री नाट्य प्रयोगास अहिल्यानगरमध्ये प्रतिसाद

0
27

नगर – सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान अहिल्यानगर यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती औचित्य साधून माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन जवळ, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर गाजलेले ’मी सावित्री ज्योतिराव फुले’ एकपात्री नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाट्य प्रयोगाला अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरीकांनी प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रेहमत सुलतान फौंडेशन, अहिल्यानगरचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, विनयकराजं फौंडेशनचे अध्यक्ष उद्योजक विपुल वाखरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भिंगार अर्बन बँकचे संचालक महेश झोडगे, सातारा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब क्षेत्रे, सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियानाचे मुख्य संयोजक सुदाम लगड उपस्थित होते.
यावेळी विपुल वाखरे म्हणाले की, सरकारी शाळा वाचवणे काळाची गरज आहे. या अभियानासाठी मी आपल्या सोबत कायम आहे.

यावेळी बोलताना महेश झोडगे म्हणाले की, आज भांडवलशाही निर्माण झाली आहे. त्या विरुध्द सरकारी शाळा जगवणे व वाचवणे हे आपले परम कर्तव्य आहे. ज्ञानदेव पांडूळे म्हणाले की, आपण सर्वांनी सरकारी शाळा वाचवून बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपण संघटीत होऊन हा लढा चालू ठेवणे खुप गरजेचे आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात युनूसभाई तांबटकर म्हणाले की, कविताताई मेहेत्रे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व केलेला संषर्घ, शिक्षणासाठी दिलेले योगदान याचे हुबेहुब चित्रण प्रेक्षकांसमोर उभे केले. त्यामुळे प्रेक्षकांना सावित्रीबाई फुलेंचे कार्य समजले. शिक्षण किती महत्वाचे आहे. आणि शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी सुरु असलेल्या सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियान हे आजच्या काळाजी गरज असून सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे, असे
त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात रावसाहेब क्षेत्रे यांनी सरकारी शाळा वाचवा अभियानाची कल्पना सांगितले. व पाहुण्याचा परिचय करुन दिला. सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियानाच्यावतीने नागरीकांना सावित्रीबाई फुले व ज्योतिबाफुले यांचे कार्यांची माहिती व्हावी. आणि त्यानी शिक्षणासाठी जो संघर्ष करुन त्यांनी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता महिलांसाठी शाळा सुरु केली. शिक्षणातून समाज घडत असतो. त्यामुळे सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आल्याचेत्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद द्रविड यांनी केले. श्रीकांत राऊत यांनी आभार मानले.