नगर – नागपूर येथे झालेली दंगलीची घटना सुनियोजित कटाचा भाग असून,
राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे
याप्रकरणी दोषी असलेल्यांवर आणि सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीर नेत्यांवर कठोर
कारवाई करावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा
देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा पुसून टाकण्यासाठी राज्यभरात महापुरुषांच्या बदनामीचे
कारस्थान रचून, तसेच बेताल वक्तव्ये करुन धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचा कुटील डाव
देशविघातक प्रतिगामी शक्तींकडून सुरु आहे. मुख्य म्हणजे अशा देशविघातक प्रतिगामी
शक्तींना राज्यातील सत्ताधारी भाजपा महायुती सरकारचे उघड उघड पाठबळ मिळत
असल्यामुळे राज्यात धर्मांध शक्तींनी मोठा उच्छाद मांडला असल्याचा आरोप करण्यात
आला आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर वाद उकरून काढण्यात येत आहेत.
याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल बदनामीकारक
वक्तव्ये केली जात आहेत, त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. भारतीय
राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेवर आलेले सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्री बेताल वक्तव्ये करुन आणि
चुकीच्या इतिहासाची मांडणी करुन तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दोन समाजात
धार्मिक तेढ निर्माण होऊन, राज्यात ठिकठिकाणी दंगलसदृश दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचाच विस्फोट होऊन नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या घटनेचे रुपांतर पुढे दंगलीत होऊन त्यात
पोलिसांसह अनेकजण जखमी झाले आहेत. रमजानचा महिना सुरू असताना आणि
औरंगजेबाच्या कबरी वरून राज्यभर तनावाची परिस्थिती असताना नागपूर मधे विश्व
हिंदू परिषद व बजरंग दल यांना संवेदनशील परिस्थिती असताना एकत्र येण्याची
परवानगी देण्यात आली, त्यानंतरच वादाला सुरुवात झाली अशी माहिती आहे. पोलिसांनी
दंगल झाल्यावर जी तत्परता दाखवली ती अगोदरच दाखवली असती तर पुढील घटना
घडली नसती, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षांसह डाव्या पक्षांनी दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे.
वास्तविक नागपूर शहर शांत व धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी
अपवाद वगळता यथे धार्मिक अथवा जातीय दंगल झालेली नाही. पण १७ मार्च रोजी
झालेल्या दंगलीमुळे याला गालबोट लागले आहे. सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांना वेळीच
रोखले असते, तर राज्यात अशी अशांतता निर्माण झाली नसती. त्यामुळे राज्य शासनाने
आतातरी तत्परता दाखवत, धार्मिक तेढ निर्माण करणार्या अशा व्यक्ती व संघटनांवर
तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
राज्यात सद्यस्थितीला श्रमिक, कष्टकरी, शेतकरी व गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे अनेक
गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच धर्मांध शक्तींकडून धार्मिक ध्रुवीकरणाचा
हा अजेंडा पुढे रेटला जात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही अफवांना आणि धार्मिक
विद्वेषाला बळी न पडता, संयमी व विवेकी भूमिका ठेवून आपापसातील सौदार्य वाढवावे, असे आवाहन
भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे, असे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अॅड. सुभाष लांडे म्हणाले.