नगर – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन
सोशल फेडरेशनतर्फे आनंदधाम- मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक गायन स्पर्धेत सोहम भंडारी याने तर खुल्या गायन स्पर्धेत प्रियदर्शन ग्रुप आणि सुरीले आनंदयात्री ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. सौ.मनिषा लोढा व निखिलेंद्र लोढा यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ.मनिषा लोढा म्हणाल्या, आचार्यश्रींना भक्ती संगीताची फार आवड होती. विविध भाषांमधील संगीताचा ते तल्लीनतेने आनंद घेत. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आनंदधाममध्ये
भक्तीगित गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या पाठीवर
थाप देत आकर्षक पारितोषिक दिली जात आहेत. हा पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे आचार्यश्रींच्या चरणी
अर्पण केलेली स्मृतीपुष्पेच होत.
स्पर्धेचा निकाल सरोजताई कटारिया यांनी घोषित केला तो असा:- वैयक्तिक भक्ती गीत गायन स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रिध्दी मेहेर व रोशनी बोरा यांना तर तृतीय क्रमांक आयुष कासवा व रिध्दी सोनार यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्रावणी काळे, श्रृतिका दरेकर, अनायरा चोरडिया, श्रध्दा पालवे, हर्षदा औटी, रिया मुनोत व मोहिका भंडारी यांना देण्यात आली.
समुह भक्ती गीत गायन स्पर्धेतील छोट्या गटात द्वितीय क्रमांक भिंगार येथील छावणी परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक सुरीले आनंदयात्री ग्रुप दोनने घेतला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री तिलोक आनंद जैन पाठशाळा, पार्श्वग्रुप भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, आनंद संस्कार शिक्षा अभियान आणि सुमति ग्रुप भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मिळवले.
खुल्या समुह भक्ती गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक ब्राह्मी युवती मंचने तर तृतीय क्रमांक वर्धमान महिला मंडळाने मिळवला. कुंदन अॅटीव्ह ग्रुप, स्टार परिवार आणि त्रिशला ग्रुप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. परीक्षक म्हणून कल्याण मुरकुटे आणि सौ.अमृता बेडेकर यांनी काम पाहिले. सीमा मुनोत यांनी आभार मानले. दोन दिवस चाललेल्या या
स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सपना कटारिया आणि सिमरन मुनोत यांनी परिश्रम घेतले.
झी टॉकीज फेम आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन १ चा विजेता कु.सार्थक
शिंदे याची भक्ती संध्या मैफिल उत्साहात पार पडली. आरोही बेडेकर हिच्या भावपूर्ण सुरातील आनंद धून आणि हम कथा सुनाते गुरू आनंद की या भक्तिगीताने भक्तिसंध्येचा शुभारंभ करण्यात आला. क्रांती शिंदे हिने णमोकार मंत्र म्हटला. सार्थक शिंदे याने वेडा रे पंढरी, कबीरा कहे जग ये अंधा, राम नाम के साबुनसे, ऐसी लागी लगन, छेडू नको रे नंदलाला, चढता सुरज ही गीते-गवळण गायिली. क्रांती शिंदे हिने चंद्रभागेच्या तिरी हे भक्तीगीत सादर केले. स्तुती वाकोडे हिने यही वो दरबार है, दमा दम मस्त कलंदर ही गीते म्हटली. ऋषी साळवे आणि विजय शिंदे या दोघांनी ये तो सच है की भगवान है हे गीत सादर केले. भक्तिसंध्येचे सुरेख सूत्रसंचालन आणि निवेदन प्रा. डॉ. सुनिल कात्रे यांनी केले. भक्तिगीतांना
निखिल ताकभाते (तबला), नकुल कोळी (पखवाज), सुशील सकट (ढोलकी), हर्षवर्धन मोरे (किबोर्ड),
अविनाश लांडगे (बॅन्जो) आणि रवी भोसले (आटोपॅड) या कलाकारांनी वाद्यांची सुरेल साथ संगत केली.