नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारा असून तो सर्वांपर्यंत घेऊन जाण्याचे काम शिवशंभो गर्जना या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. हनुमान तरुण मंडळ व बजरंग ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यापासून ते नेप्ती गावापर्यंत पायी ज्योत आणण्यात आली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढली, गायक अभिजीत जाधव व अमोल जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटावरील पोवाडा सादर केला, त्याचबरोबर संभळ वादन करीत नागरिकांची मन जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, भाजपचे अक्षय कर्डिले, आकाश बेग आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले असून सर्वांना बरोबर घेऊन शेतकर्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहे, युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श अंगीकारून समाजाप्रती चांगले काम उभे करावे, शिवशंभो गर्जना कार्यक्रमाच्या माध्यमातून पोवाडे सादर होत असताना अक्षरशा अंगावर शहारे निर्माण होत होते, असे मत सचिन जगताप यांनी व्यक्त केले.
समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवकांना दिशा देणारे आहे असे मत अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले.