ब्राह्मण समाजात मध्यस्थ ही व्यवस्था लोप पावली आहे.

0
19

आदिनाथ जोशी यांचे प्रतिपादन; श्री शुल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या सर्व शाखीय वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद

नगर – मुला-मुलींचे विवाह योग्य वयात करणे ही सध्या फार मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. मुला मुलींच्या आपल्या जोडीदारासाठीच्या अवास्तव अपेक्षा, नोकरी करणार्‍या मुलींच्या अपेक्षा, मुलांचे वाढते वय, या बरोबरच सामाजिक
परंपरा आणि समाजातील पोटजातींना दिले जाणारे अकारण महत्व. या सर्व परिस्थितीचा विचार करता ब्राह्मण समाजात
लग्न जमवणे हे अतिशय कठीण होत चालले आहे. त्यातच पूर्वी असलेली मध्यस्थ ही व्यवस्था लोप पावली आहे. या परिस्थितीचा विचार करून आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मध्यस्थाच्या भुमिकेतून संस्थेने या परिचय मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सांगितले. अहिल्यानगर येथील श्री शुल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने चालवल्या जाणार्‍या शुभयोग वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने ९ मार्च रोजी सावेडी येथील
ज्येष्ठ नागरिक मंचाचे सभागृहामध्ये ब्राह्मण समाजाच्या सर्व शाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ जोशी, उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, सचिव विलास बडवे, सहसचिव मोरेश्वर मुळे, विश्वस्त
नंदकुमार निसळ, दत्तात्रय (मयूर) जोशी, किरण वैकर, व्यवस्थापिका सौ. अबोली वैकर आदींच्या हस्ते विधीवत  मंत्रोच्चारात  श्रीगणेश पूजन करून परिचय मेळाव्यास सुरुवात झाली. या मेळाव्यास प्रथम वधू-वरांबरोबर घटस्फोटित,
तसेच दिव्यांग अशा ४८ मुलांनी आणि १७ मुलींनी सहभाग नोंदविला. उपस्थित वधूय्वरांनी स्वतः आपला परिचय
करून देत आपल्या कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती दिली तसेच आपल्या जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा
विषद केल्या. मेळाव्यास उपस्थित नसलेल्या मुला-मुलींची सविस्तर माहिती संस्थेचे वतीने श्री मोरेश्वर मुळे यांनी उपस्थितांना
दिली. सर्वांना या प्रसंगी अल्पोपाहार देण्यात आला. वधू-वरांच्या पालकांनी या मेळाव्यासंदर्भी समाधान व्यक्त केले. संस्थेने
अशाप्रकारचे संवादात्मक मेळावे सातत्याने घ्यावेत अशी मागणी बहुतेक पालकांनी संस्था विश्वस्तांकडे केली.
मेळाव्यानंतर अनेक पालकांनी एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण केली.