वकिलाच्या घरातून दागिने चोरणार्‍या नातेवाईक महिलेला पकडले

0
31

चोरलेले ५७ तोळे ९ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत, सोने विकत घेणारा सराफही अटकेत

नगर – घरातील लग्न समारंभा करिता लाँकर मध्ये ठेवलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवलेले असताना अज्ञात चोरट्याने ६४ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ऐवज लग्न समारंभाच्या गडबडीत नजर चुकवून चोरून नेला. ही घटना सावेडी परिसरातील रेणावीकर शाळेच्या मागे उदय हाऊसिंग सोसायटी येथे ८ ते ९ मार्च दरम्यान
घडली. दरम्यान सोमवारी (दि.१०) गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी २४ तासांत एका महिलेला पकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत. तसेच काही दागिने विकत घेणार्‍या सराफालाही  अटक करण्यात आली आहे. याबाबत ड. निखिल बबन वाकळे (वय ३४, रा. उदय हौसिंग सोसायटी, रेणावीकर शाळेच्या मागे, अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की त्यांचा लहान भाऊ मनोहर याचे ७ मार्च रोजी लग्न असल्याने त्यांनी लग्न समारंभाकरिता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घरी आणले. लग्नाच्या दिवशी घरातील लोकांनी सर्व दागिने अंगावर घातले होते. दिवसभर अंगावर दागिने ठेवून रात्री आठ वाजल्याच्या सुमारास अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने घरातील कपाटामध्ये ठेवले होते. त्यानंतर ते सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अ‍ॅड. निखिल वाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द
घरफोडीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक अमोल गायधनी हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पो.नि. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला आणि २४ तासांच्या आत हा गुन्हा
उघडकीस आणला आहे. सदर चोरी ही लग्न समारंभासाठी आलेल्या नातेवाईक महिलेने केल्याचे उघड झाले. पोलिसांनी
तिला पकडून तिने घराजवळील पडया जागेत खड्डा करून पुरून ठेवलेले ५७ तोळे ९ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. तसेच काही सोने हे एका सोनाराला विकल्याचे त्या महिलेने सांगितले असून पोलिसांनी त्या सोनारालाही ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई पो.नि. आनंद कोकरे, स.पो.नि.उज्ज्वल राजपूत, उप निरीक्षक अमोल गायधनी, पोलिस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनिल चव्हाण, वसीम पठाण, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे यांच्या पथकाने केली.