पीओपीवर बंदी घालून हिंदू संस्कृती व गणेशोत्सव बंद पाडण्याचे षडयंत्र

0
67

वसंत लोढा यांचे प्रतिपादन; श्री गणेश मूर्तिकार संघटना, गणेश मंडळे व हिंदुत्ववादी संघटना यांचे संयुक्त बैठक

नगर – गणेशोत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत
असतो. स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍या लोकांनी या उत्सवात अडथळा
निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्व.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी
१५ वर्षांपूर्वी अंधश्रद्धेच्या नावाखाली पीओपी वर बंदी घालून हिंदू
संस्कृती व गणेशोत्सव बंद पाडण्याचे षडयंत्र रचले आहे. पीओपी मुळे
कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हे शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मोघे यांनी
निरीक्षणाद्वारे सिद्ध केले आहे. पीओपी नैसर्गिक आहे. पीओपी याचा
उपयोग शेतीचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. उलट शाडू माती मुळे
होणारे प्रदूषण हे घातक आहे. शाडू मातीचे कुठल्याही प्रकारे संशोधन
न करता शाडू मातीचा वापर करावा, असे सांगितले जात आहे.
हे चुकीचे आहे. लोकमान्य टिळकांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात
आवाज उठवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला एकत्र करण्यासाठी
गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पेटवली.
हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून १० दिवस जात पंथ दूर ठेवून सर्व समाज
एकत्र होतात. गणेश उत्सवात समाजाची एकता अखंडता देशात दिसून
येते. या गणेश मंडळांमुळे नगरसेवक, आमदार, खासदार असे नेतृत्व
मिळाले आहेत. या गणेश उत्सवाला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी मोठे षडयंत्र सुरू आहे.
गणेशोत्सव हा हिंदूंच्या अस्मितेचा व हिंदू धर्माचा स्वाभिमानाचा विषय आहे. यासाठी मोठे
आंदोलन उभे करावे लागेल. सर्व गणेश मंडळे, हिंदुत्ववादी संघटना व सर्व राजकीय पक्षांनी
पक्षात काम करून मूर्तिकार संघटनेच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे प्रतिपादन भाजपचे
वसंत लोढा यांनी केले आहे.
पीओपी गणेश मूर्ती वरील बंदी कायमस्वरूपी रद्द करावी, या मागणीसाठी अहिल्यानगर
शहरातील गणेश मूर्ती कारखानदार, गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बैठकीचे
नियोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बापू ठाणगे, वसंत लोढा,
निखिल वारे, बाळासाहेब पवार, सचिन शिंदे, सुनील त्रंबके, महेश लोंढे, भाजपा ओबीसी
शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, राजू मामा जाधव, सचिन मुदगल, दिगंबर गेंट्याल,
दिलदारसिंग बिर, उत्कर्ष गीते, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, भगवान
जगताप, गणेश देवतरसे, अंकुश साबळे आदींसह श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी,
हिंदुत्ववादी संघटना तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निखिल वारे म्हणाले, अवैध कत्तलखाणे पाडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले
असताना देखील कारवाई होताना दिसत नाही. परंतु कष्टकरी, प्रामाणिक, गणेश मूर्ती
कारखानदारांवर कारवाईचा बडगा उभारला जातो. हिंदूंचे सरकार असताना गणेश मूर्ती
कारखानदारांना त्रास दिला जातो. हे दुर्दैव आहे. गणेश मूर्ती कलाकारांनी सुबक गणेश मूर्ती
तयार करून राज्याची बाजारपेठ अहिल्यानगर येथे तयार केली आहे या गणेश मूर्तींना
देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नियमांच्या नावाखाली कलाकारांना त्रास देण्याचा
प्रयत्न केला. तर सर्वांनी ताकतीने उभे राहू. पीओपी मुळे होणारे प्रदूषणापेक्षा एमआयडीसीत
होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. मूर्ती कलाकारांना जर कोणी अन्याय करत असेल तर
राजकीय मतभेद बाजूला ठेवू.
दिगंबर गेंट्याल म्हणाले, पीओपी वर बंदी आणून हिंदूंचे सण उत्सव बंदी आणण्याचा
हा कुटिल डाव आहे. रंगपंचमीमुळे पाण्याची नासाडी होते. होळी सणामुळे लाकडाचा मोठ्या
प्रमाणात वापर होतो. तसेच दिवाळीचे फटायांमुळे मोठे प्रदूषण होते, असे सांगून हिंदू
संस्कृतीवर व परंपरांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिलदार सिंग बीर म्हणाले, गणेश मूर्ती या लोखंडाच्या तयार
होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती
तयार करता येतात. शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती एक ते दोन
फुटापर्यंतच तयार करता येतील. शाडू मातीचा वापर केल्यास प्रदूषणही
मोठ्या प्रमाणात होईल. तसेच मोठे गणपती नसल्याने गणेश मंडळाचा
उत्साह कमी होईल. हे संकट मंडप, व्यावसायिक, पूजा साहित्य या
सर्वांवर असून यासाठी जर आंदोलन करायचे असेल तर बागडपट्टीचा
राजा गणेश मंडळ संपूर्ण सहकार्य करेल.
सचिन शिंदे म्हणाले, गणेश मूर्ती कलाकारांना कुठल्याही
प्रकारचा त्रास अन्याय झाला तर ३६५ दिवस त्यांच्या मदतीसाठी
व सहकार्य करु. ज्या ज्या वेळेस आंदोलन करण्यात येईल त्या
त्या वेळेस त्यांच्यासोबत पुणे, मुंबई, दिल्ली येथे जाण्यासाठी तयार
असल्याचे त्यांनी सांगितले.
बापू ठाणगे म्हणाले हिंदूंनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज
आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने अहिल्यानगर येथे मोर्चा काढण्यात
येईल. हिंदू संस्कृती व हिंदू सणांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याला
संपूर्ण हिंदू समाज कडाडून विरोध करेल.
भरत निंबाळकर प्रास्ताविकात म्हणाले, गणेश मूर्ती कलाकार पी.ओ.पी च्या मूर्ती
वर्षभर बनवीत असतो त्यावर आमच्या हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु केंद्रीय
प्रदूषण नियंत्रण मंडळ व त्याच्या जाचक आटींमुळे पी.ओ.पी मूर्तीवर बंदी आल्यास आम्ही
आमच्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आम्हाला
बेरोजगार करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा व महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धार्मिक सण
उत्सव आणि त्यातील मूर्तीचे आकर्षण कमी होणार नाही याची दखल शासनासह प्रदूषण
महामंडळाने घेतली पाहिजे. आमच्या व्यवसायासह भारतीय नागरिकांच्या आनंदावर विरजण
घालणारी पी.ओ.पी मूर्ती वरील बंदी रद्द करावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान जगताप व गणेश देवतरसे यांनी केले. तर आभार
अंकुश साबळे यांनी मानले.