शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळच दररोज होतेय वाहतुकीची कोंडी

0
63

वाहनचालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप, मात्र वाहतूक शाखेला गांभीर्यच नाही

नगर – अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे असणारे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयालगत च्या पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांना तासन तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र याचे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोणतेही गांभीर्य वाटत नसल्याने ते त्याकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तसेच दहावी च्या परीक्षाही लवकरच सुरु होणार आहेत. शहरातील अनेक शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी या रस्त्यानेच जावे लागत असते. त्यातच सतत होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पत्रकार चौकापासून जवळ असणारे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिकांची ये जा सुरु असते. या रुग्णवाहिकांना पण या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आणि अनेक वेळा रुग्णवाहिका रुग्णांना नेत असताना या वाहतूक कोंडी मध्ये अडकलेली पाहायला मिळते. जर एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचारांची आवश्यकता असेल आणि वाहतूक कोंडी मुळे त्याला वेळेवर हॉस्पिटल मध्ये दाखल करता न आल्याने तो जर दगावला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहतूक शाखेचे अस्तित्व जाणवेना

पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यंत रस्त्यावरील वाहतूक कोंडीबरोबरच अहिल्या नगर शहरामध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र कोणत्याच भागात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसत नाहीत.त्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी करण्यास वाव मिळतो त्याचे परिणाम सर्वसामान्य नगरकरांना दररोज भोगावे लागते. त्यामुळे शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे अस्तित्वच जाणवत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तत्काळ लक्ष घालून वाहतूक कोंडीवर उपायोजना करण्याचे आदेश शहर वाहतूक नियंत्रण शाखेला द्यावेत अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.