मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
25

जीभ बाहेर काढायला सांगून डॉटर काय तपासतात?

डॉटरांकडे गेल्यावर स्टेथास्कोपने तपासणे आणि जीभ बाहेर काढून तपासणे, या दोन गोष्टी डॉटर करतात; हे आपण लहानपणापासून बघत आलो आहोत. प्रसंगी कोणी डॉटरांना वाकडे दाखवून पूर्वी दिलेला इंजेशनाचा, कडू औषधाचा सूडही घेतला असेल! बर्‍याच आजारांचा परिणाम आपल्या जीभेवर दिसून येत असतो. जिभेला पचनसंस्थेचा आरसाच म्हटले जाते. काही काही आजारांचे निदान केवळ जीभ पाहून होऊ शकते. जीभ बाहेर काढायला लावून डॉटर जीभेचा रंग, जिभेवर जमलेला थर, चिरा, व्रण, जिभेचा आकार, जिभेच्या हालचाली आणि जिभेवरील स्वादांकुर बघतात. निरोगी व्यक्तीची जीभ लालसर, ओली आणि विशिष्ट आकाराची असते. जिभेवर थोडासा थर असतो, परंतु तो फक्त जिभेच्या मागच्या बाजूस असतो. काविळीमध्ये जीभ लाल न दिसता पिवळसर दिसते. शरीरात रक्त कमी झाले असेल, तर जीभ लाल न दिसता फिकट दिसते. ऑसिजनच्या कमतरतेमुळे जीभ निळसर दिसते. जिभेवर पांढरट- पिवळट थर जमला असेल तर आजारपणाचे किंवा अस्वच्छतेचे लक्षण असते. तापामध्ये तोंड आलेले असेल किंवा दातांच्या आजारामुळे किंवा कुठल्याही आजारामुळे तोंड उघडावयास त्रास होत असे किंवा तोंडाची स्वच्छता नीट राखली नसेल, तर जीभेवर थर जमतो, नाकाच्या काही आजारात, नाक चोंदल्यामुळे, तोंडाने श्वासोच्छ्वास करण्यानेही जिभेवर थर जमतो. टॉयफाइडच्या तापात जीभ ही फक्त मध्यभागीच थरयुक्त असते. या आजाराचे निदान करण्यासाठी जीभ बघण्याचा चांगला उपयोग होतो. पचनसंस्थेच्या आजारामध्ये, अजीर्ण झालेले असल्यास, क्षयरोगामध्ये, मधुमेहामध्ये जिभेवर थर जमतो. मोठ्या प्रमाणात शरीरातून पाणी गेले असेल तर; उलट्या-हगवण यांत, जीभ कोरडी दिसते. तीव्र आजारातही जीभ कोरडी दिसते. अर्धवट तुटलेल्या दातांमुळे जीभेवर जखमा दिसतात. जिभेच्या कडकपणा जाऊन ती शिथिल दिसत असेल, एका बाजूला झुकलेली दिसत असेल, तर ते पक्षाघाताचे लक्षण असते. बघा, डॉटरांना किती गोष्टी एवढ्याशा जिभेवरून कळतात!