तलवार, लाकडी दांडके, मिरचीपूडसह दरोडेखोरांची टोळी नगरजवळ पकडली

0
31

नगर – एमआयडीसी परिसरात नगर- मनमाड बायपास रोडवर साईबन कडे जाणार्‍या रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली चौघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या टोळीतील १ जण मात्र पसार झाला आहे. पकडलेल्या चौघांकडून तलवार, लाकडी दांडके. मिरचीपूड, नायलॉन रस्सी, पल्सर व प्लॅटीना मोटार सायकल असा एकुण १ लाख ९२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रज्वल प्रताप देशमुख (वय २२, रा. जवळे कडलग, ता. संगमनेर), अशोक रघुनाथ गोडे (वय २४), भरत लक्ष्मण गोडे (वय २५, दोन्ही रा. तिरडे, ता. अकोले) व सुयोग अशोक दवंगे (वय २०, रा. हिवरगांव पावसा, ता. संगमनेर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय काळे (रा. सुरेगांव, ता. नगर) हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे.

स्थानिक गुन्हे पो. नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे शाखेतील स.पो.नि.हेमंत थोरात व अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, संभाजी कोतकर व अरुण मोरे अशांचे पथक नेमुन गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपासकामी पाठवले होते. हे पथक नगर जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पो.नि.दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की, प्रज्वल देशमुख हा सराईत गुन्हेगार त्याचे ४ ते ५ साथीदारांसह २ मोटार सायकलवर येवुन नगर- मनमाड जाणारे बायपास रोडवरील साईबनकडे जाणारे रोडलगत कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात दबा धरुन बसलेले आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी सदर पथकाला कारवाई साठी पाठवले. या पथकाने तेथे जावून खात्री केली असता तेथे काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पथक संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना, त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन ४ जणांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी तेथुन एक जण अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. पकडलेल्या चौघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.दं. वि.कलम ३९९, ४०२ सह आर्म अ‍ॅ़ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.