खा. निलेश लंके समर्थकांकडून विखे समर्थकाच्या पत्नीला मारहाण

0
51
oppo_2

 

अ‍ॅड.राहुल झावरेसह २४ जणांविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

नगर – खा. निलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे याने साथीदारांच्या मदतीने पारनेर तालुयातील गोरेगाव येथील विखे समर्थकाच्या पत्नीला घरात घुसून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत तिला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (दि.६) सकाळी घडली. दरम्यान घाबरून पीडित महिलेने पारनेरला न जाता शुक्रवारी (दि.७) नगरमधील तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अ‍ॅड.राहुल झावरेसह २४ जणांविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुरूवारी दुपारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर १५ ते १६ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झावरे यांनी साथीदारांसह महिलेसोबत गैरवर्तन केल्यानंतरच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. फिर्यादी महिला पारनेर तालुयातील एका गावात कुटुंबासह राहतात. त्या गुरूवारी सकाळी घरासमोर उभ्या असताना साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अचानक तीन ते चार चारचाकी वाहने त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून अ‍ॅड. राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदु दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभरी पोटघन, दादा शिंदे, बापु शिर्के, बाजीराव कारखिले, किशोर ठुबे, सचिन ठुबे, दीपक लंके, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, गंधाक्ते (पूर्ण नाव नाही), संदेश बबन झावरे (सर्व रा. पारनेर) उतरले.

अ‍ॅड. झावरे याने फिर्यादीला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. नवरा कुठे आहे? अशी विचारणा करून त्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून मारहाण केली. ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दीपक लंके, संदीप चौधरी यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. राजु तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदु दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरड यांच्या हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके होते. दरम्यान, फिर्यादीने घाबरून नवरा घरात नसल्याचे सांगितले. त्यांच्या सासू – सासर्‍यांनी विनंती करून देखील अ‍ॅड. झावरे व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ केली व तेथून निघून गेले. घाबरलेल्या पीडित फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाने अ‍ॅड. झावरे व त्याच्या साथीदारांच्या भितीने गाव सोडून नगर गाठले. दुसर्‍या दिवशी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपासकामी तो पारनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

भाजप पदाधिकार्‍यांकडून कारवाईची मागणी

पीडित महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) दिलीप भालसिंग, पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सुपा येथे आयोजित पत्रकार परीषदेत केली. निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला. तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका, अशा शब्दांत त्यांनी नवनिर्वाचित खासदारांचा समाचार घेतला.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहेत. गुरूवारी खा. निलेश लंके समर्थक अ‍ॅड. झावरे आणि त्याच्या साथीदारांनी पारनेर तालुयातील एका गावातील विखे समर्थक व्यक्तीच्या गर्भवती पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. यासंदर्भातील माहिती पीडिताने पत्रकार परीषदेत दिली. जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेवून या घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.