निंबळक, इसळक, खारेकर्जुने गावांचा नेप्ती मंडळात समावेश करा

0
36

डॉ. दिलीप पवार यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निंबळक – नगर तालुयातील निंबळक इसळक, खारेकर्जुने ही गावे जिरायती भागात असल्यामुळे हि गावे नेप्ती मंडलात जोडण्यात यावीत. येथे नवीन पर्जन्यमापक बसविण्यात यावे. या बाबतचे निवेदन नगर पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना दिले. निंबळक, इसळक, खारेकर्जुने ही गावे सध्या नागापुर मंडलात समाविष्ट आहेत. या भागातील पर्जन्यमापक नागापुर परिसरात असून त्या ठिकाणी सीना नदीचा परिसर आहे. या मंडलात येणारी इतर गावे बागायत क्षेत्राची आहेत. विळद, देहरे, नांदगांव, शिंगवे या गावांचे बागायत क्षेत्र असून, हे शहरी मंडल आहे. निंबळक, इसळक, खारेकर्जुने या गावांचे क्षेत्र जिरायत आहे. खारेकर्जुने या गावात के.के.रेंजचे क्षेत्र आहे. येथे मोठ्या प्रमाणात क्षेत्र पडीक व नापिक असल्याने शेतकर्‍यांना पिकविमा, खराब हवामानामुळे मिळणार्‍या शासकीय सुविधा, कृषि विभागाच्या सुविधा, शेती कर्जाचे पुनर्गठन व इतर सुविधांपासुन वंचित राहावे लागते.

त्यामुळे नागापुर मंडलातील वरील तिन्ही गावातील शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष अन्याय होत आहे. निंबळक, इसळक, खारेकर्जुने ही गावे कमी पर्जन्यमानाची असूनही येथील शेतकरी वर्गावर चूकीची आनेवारी बसल्याने पिक विमा किंवा इतर बाबतीत नुकसान होते. या भागातील शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी नव्याने तयार झालेल्या नेप्ती मंडलात या गावांचा समावेश करावा, तसेच या परिसरात नवीन पर्जन्यमापक बसवावा. असे निवेदन देण्यात आले. ही मागणी मान्य न झाल्यास वरील तीनही गावांतील शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, निंबळकचे शिवसेना शाखाप्रमुख बी.डी.कोतकर, बापू गेरंगे, संदीप गेरंगे, पोपट गाडगे, संतोष गेरंगे, महादेव गवळी, पांडुरंग पवार, विकास शेळके, सुमित लांडे, गोरक्षनाथ नरवडे, सहदेव लांडे, निलेश पाडळे आदि उपस्थित होते.