चित्रकला मनातील ताणतणाव दूर करते : नरेंद्र फिरोदिया

0
32

भंडारी ड्रॉईंग लासच्या दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
=

नगर – सध्याच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स- मुळे क्षणभरात कोणतेही चित्र आपण संगणकाकडून काढून घेऊ शकतो. अशा या युगात चित्रकलेचे शिक्षण घेऊन स्वत:ची बुध्दीमत्ता, कला सिध्द करणे कौतुकास्पद आहे. चित्रकलेमुळे मनातील ताणतणाव नाहिसा होतो असे सांगितले जाते. त्याचा अनुभव सर्व कलाकारांना नक्कीच आला असेल. नगरमध्ये अनेक गुणी कलाकार आहेत. या कलाकारांना सोनिया भंडारी यांच्यासारख्या कला शिक्षकांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. नगरचे कलाकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नक्कीच जातील. त्याची सुरुवात या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली आहे, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

सारसनगर येथील भंडारी ड्रॉइंग लासेसच्यावतीने टिळकरोडवरील पटेलवाडी मंगल कार्यालयात आयोजित दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र फिरोदिया बोलत होते. या कार्यक्रमास कलाकार रवींद्र सातपुते, डॉ.अमोल बागूल, उद्योजिका श्रध्दा बिहाणी, शहर बँकेचे संचालक डॉ.विजय भंडारी, लासच्या संचालिका सोनिया भंडारी, सचिन भंडारी, सिध्दार्थ भंडारी आदी उपस्थित होते. सर्वांनी चित्र प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पोट्रेट, स्केच, शेडिंग, कलर पोस्टर, ऑईल पोस्टर असे चित्रकलेचे विविध प्रकार असलेली अतिशय मनमोहक चित्रे प्रदर्शनात लावण्यात आलेली आहेत. विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांनीही प्रदर्शनाला भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. रवींद्र सातपुते म्हणाले, कोणत्याही शहराचा विकास रस्ते, इमारती नव्हे. शहरात कलेला पोषक वातावरण असेल तर खरा विकास साध्य होतो. आपल्या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. ती सुध्दा एक कलाच आहे. कला खर्‍या अर्थाने माणसाला समृध्द करते. लहान वयातच मुलांना कलेची गोडी लावली पाहिजे. भविष्यातील कलाकारच नगर शहराची वेगळी ओळख बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमोल बागूल म्हणाले, नगरच्या कलाकार, खेळाडूंना सतत प्रोत्साहन देण्याचे काम फिरोदिया परिवार करीत आहे. चित्र प्रदर्शनातील चित्रे पाहिल्यावर थक्क व्हायला होते. चित्र काढताना प्रकाशाचा अतिशय चपखल वापर विद्यार्थ्यांनी केला आहे. हा प्रकाश विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्याचे काम त्यांच्या शिक्षिका सोनिया भंडारी यांनी केले आहे. कलेचा एक मोठा खजिना या प्रदर्शनातून जगासमोर आला आहे. श्रध्दा बिहाणी सोनिया भंडारी म्हणाल्या, यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला अनेक आकार देण्याचे काम चालवले आहे. या चित्र प्रदर्शनाला भेट देणार्‍यांना कलेचा निखळ आनंद मिळेल. त्यांचे मन ताजेतवाने होईल, तणाव विरहित होईल. दरवर्षी असे चित्र प्रदर्शनात भरविण्यात यावे. विद्यार्थीनी गायत्री कचरे हिने मनोगतात सांगितले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याचे एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे. आमच्यासाठी हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. आपल्या कलाकृतीचे होणारे कौतुक पाहून आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. उपस्थितांचे स्वागत सचिन भंडारी यांनी केले.

प्रास्ताविकात सोनिया भंडारी म्हणाल्या, आमच्या लाससाठी हा अतिशय महत्वाचा क्षण आहे. गेल्या तेरा वर्षांपासून चित्रकला शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्यास भरपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. कोणतीही कला ही उपजत असेल तर ती चांगली बहरते. अशाच गुणी चित्रकारांना हिर्‍याप्रमाणे पैलू पाडल्यावर ते चमकून दिसतात. या चित्र प्रदर्शनात लासमध्ये शिकलेल्या कलाकारांची अतिशय सुंदर चित्रे सर्वांना पहायला मिळत आहेत. कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या कलेला मिळालेली उत्स्फूर्त दाद महत्वाची असते. त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप पडल्यावर ते आणखी उत्साहाने झोकून देत काम करतात. नगरकर हे कलारसिक आहेत. कलेला, कलाकारांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अशाच प्रोत्साहनातून अनेक गुणी चित्रकार देशपातळीवर नाव कमावतील असा विश्वास आहे. सूत्रसंचालन सानिका पिपाडा व स्नेहल कासवा यांनी केले. सिध्दार्थ भंडारी यांनी आभार मानले. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी रसिक नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन शनिवारीही सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले असणार आहे.