पारनेर – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेर मध्ये विजयी उमेदवार निलेश लंके आणि पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राजकीय वादातून गुरुवारी (दि.६) दुपारी चांगलाच राडा झाला आहे. लंके यांचे समर्थक असलेले अॅड. राहुल झावरे यांच्यावर कोयत्याने हल्ला करत पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी रात्री उशिरा पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी व इतर १२ जणांवर खुनाच्या प्रयत्नासह आर्म अॅटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी हल्ला झाला. या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून अॅड. राहुल झावरे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर कोयत्याने वार करत पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
अॅड.राहुल झावरेंवरील जीवघेणा हल्ला प्रकरण
लोकसभा निवडणुकीच्या दिवशी विजय औटी यांना झावरे यांच्या वनकुटे गावातून हाकलून देण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे राहुल झावरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. या जबाबावरून पोलिसांनी विजय सदाशिव औटी, विजय सदाशिव औटी, प्रितेश कुशाबा पानमंद, अंकुश भागाजी ठुबे, अंकुश उर्फ निलेश दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, मंगेश सुभाष कावरे, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहकले, प्रथमेश दत्तात्रय रोहकले, सुरेश अशोक औटी यांच्या सह ३-४ अनोळखी इसम यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३०७, ३२४, ३२३, ३४१, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, आर्म अॅट ३/२५, ४/२५ महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.