कल्याण रोडवर भरदिवसा साडेपाच लाखांची घरफोडी; सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व घड्याळे पळविली

0
33

नगर – नगर शहरातील फ्लॅटला कुलूप लावून मुलीला भेटण्यासाठी पुण्याला कुटुंबासह गेलेल्या नोकरदाराचा बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व महागडी घड्याळे असा ५ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कल्याण रोडवरील जिजाऊ नगर येथे सोमवारी (दि.३) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत सुरेश धोंडीबा औटी (रा.फ्लॅट क्र.६०४, प्रीमियम आयकॉन सोसायटी, जिजाऊनगर, कल्याण रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी औटी हे सोमवारी (दि.३) सकाळी ८ वाजता फ्लॅटला कुलूप लावून कुटुंबासह त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. ते सायंकाळी ६ च्या सुमारास नगरला आले असता त्यांना फ्लॅट मध्ये चोरी झाल्याचे समजले.

चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून आतील कपाटात उचकापाचक केली व सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम, महागडी घड्याळे व महत्वाची कागदपत्रे असा ५ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक पाटील यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत आजू बाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.