तलवार, सुरा, मिरचीपूडसह दरोडा टाकायला निघालेली सहा दरोडेखोरांची टोळी पकडली

0
40

नगर – रात्रीच्या वेळी तलवार, सुरा, मिरचीपूड, लोखंडी कटावण्या घेवून दरोडा टाकायला निघालेली दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळुंज बायपास रोडवर पाठलाग करून पकडली आहे. या टोळीतील ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ३ जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. पकडलेल्या दरोडेखोरांमध्ये भरत विलास भोसले (वय ४५), रावसाहेब विलास भोसले (वय ४७), अजिनाथ विलास भोसले (वय ३५, तिघे रा. रा. हातवळण, ता. आष्टी, जि. बीड), बबलु रमेश चव्हाण (वय २४, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापुर), कानिफ कल्याण भोसले (वय २०, रा. पारोडी, ता. आष्टी, जि. बीड), अभिष छगन काळे (वय २४, रा. अंतापुर, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. तर त्याचे ३ साथीदार कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), कृष्णा विलास भोसले (रा. हातवळण, ता. आष्टी, जि. बीड), विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) हे पसार झाले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी नेमलेल्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे हे जिल्ह्यातील चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पो.नि. आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार भरत विलास भोसले हा त्याचे ८ ते ९ साथीदारांसह चार मोटारसायकलवर येवुन नगर ते सोलापुर जाणारे रोडवर वाळुंज बायपासचे लगत अंधारामध्ये कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत थांबलेले आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी सदर पथकास कारवाई साठी पाठविले. सदर पथक त्यांना पकडण्यासाठी जात असतांना अंधारामध्ये थांबलेले ३ इसम त्यांचेकडील दोन मोटारसायकल चालु करुन भरधाव वेगात सोलापुर रोडने निघुन गेले. उर्वरीत ६ इसमांना पथकाने पाठलाग करत शिताफिने पकडले. त्यांच्या कडून तलवार, १ सुरा, २ लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरचीपुड, मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकुण १ लाख ६० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. या टोळी विरुद्ध पो.कॉ.अमोल कोतकर यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींवर दाखल आहेत मोक्क्यासह अनेक गंभीर गुन्हे

आरोपी भरत विलास भोसले हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द अहमदनगर, सोलापुर, बीड, पुणे जिल्ह्यामध्ये मोक्का, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण २१ गुन्हे, आरोपी रावसाहेब विलास भोसले याच्याविरुध्द अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण १४ गुन्हे, आरोपी अजय विलास भोसले याचेविरुध्द पुणे, बीड, अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण २१ गुन्हे, आरोपी बबलु रमेश चव्हाण याचेविरुध्द कर्नाटक राज्य व सोलापुर जिल्ह्यामध्ये खून, दरोडा, घरफोडीचे एकुण ३ गुन्हे, आरोपी कानिफ कल्याण भोसले याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, घरफोडीचे एकुण ४ गुन्हे, आरोपी अभिष छगन काळे याच्याविरुध्द छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, घरफोडीचे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत.