साळूचे शस्त्र
एका रानात एक लांडगा आणि एक साळू राहत होते. साळूचे मांस फारच रुचकर लागते, असे दुसर्या एका लांडग्याने सांगितले असता आपल्याच रानात राहणार्या साळूची आठवण लांडग्याला झाली. याच आपल्या शेजारणीला मारुन तिचे रुचकर मांस खावे, अशी अभिलाषा लांडग्याच्या मनात निर्माण झाली. एके दिवशी साळू आपल्या अंगावरील काटे उभारुन ऊन खात बसली असता लांडगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, “साळूताई, ना कुठे लढाई ना कुठे युद्ध. मग सदानकदा अंगावर अशी शस्त्रे बाळगून राहणे काही शहाणपणाचे नाही. म्हणून साळूताई, उगीच कशाला अंगावर काट्याचे ओझे वागवतेस? मी सांगतो तसे कर, अंगावरील हे काटे ठेव बाजूला काढून. आलीच लढाईची वेळ, तर ते अंगावर चढव. तुला काही कठीण नाही.” त्यावर लांड़ग्याचे कपट ओळखून साळूताई म्हणाली,” नको रे बाबा, सध्या सगळीकडे जरी शांतता असल्यासारखी वाटत असली तरी कोण कधी गनिमी कावा करुन अंगावर धावून येईल, त्याचा भरोसा नाही. तुझे म्हणणे मला पटत नाही. आणि हो, जोपर्यंत तुझ्यासारखे कावेबाज लांडगे माझ्या आसपास राहतात, तोपर्यंत तरी मला लढाई सतत चालूच आहे, असे समजून ही माझी काट्याची शस्त्रे अंगावर बाळगावीच लागणार.”
तात्पर्य: शत्रूच्या कावेबाजपणाला, भूलथापांना बळी पडून शस्त्रे टाकणे म्हणजे जाणून बुजून जीव धोयात टाकणे असेच होय.