महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

0
75

१७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर – कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, शेवगाव तालुयात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (सोनसाखळी) चोरणार्या टोळीच्या मुसया आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सहा जणांच्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २१५ ग्रॅम दागिन्यांसह १७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, तिघांकडे चौकशी केली असता १४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ धैल्या चव्हाण (वय २६, रा. मोहटादेवी मंदिरामागे, अशोकनगर, ता. श्रीरामपूर), सुनील शानिल पिंपळे (वय ३७), विशाल सुनील पिंपळे (वय २२, दोघे रा. वसु सायगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी जेरबंद केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांनी साथीदार राजेश राजू सौलंकी (रा. सुहागपूर, जि. हौशीगाबाद, मध्यप्रदेश), ऋषीकेश कैलास जाधव, रंगनाथ ऊर्फ रंग्या युवराज काळे (दोघे रा. श्रीरामपूर) यांच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असता मिळून आले नाहीत. रूपाली सुधीर कदम (वय ३२, रा. दत्तनगर, श्रीरामपूर) या बाभळेश्वर रस्त्याने जात असतांना दोन चोरट्यांनी दुचाकीवर वेगात येऊन त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने हिसकावून नेले होते. या गुन्ह्यासह जिल्ह्यातील इतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रणजित जाधव, रोहित येमूल, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तपास करत होते. पथकाने संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, शेवगाव या ठिकाणी झालेल्या सोन साखळी चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींची गोपनीय माहिती घेतली. सदर गुन्हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी विनोद ऊर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण याने साथीदारांसह केला असल्याची व तो साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करीता श्रीरामपूर – नेवासा रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना व नंतर एकाला ताब्यात घेत अटक केली आहे.