नगर – अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे ४० वी राज्य अजिंयपद मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा क्रीडा अधिकार्यांच्या सहकार्याने वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे २५ व २६ मे रोजी रंगणार आहे. शहरात होणार्या या मल्लखांब स्पर्धेत राज्यातील मल्लखांब खेळाडूंचे क्रीडाकौशल्य अनुभवण्याची संधी व चित्त थरारक क्षण अनुभवता येणार आहे. १२ व १४ वर्षे आतील मुले व मुली या स्पर्धेत सहभागी होणार असून, वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रातील तब्बल २६ जिल्ह्यांमधून मल्लखांब स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. उन्हाळा व पावसाळ्याचे वातावरण गृहित धरून मुख्य मैदान व बैठक व्यवस्था पूर्णपणे आच्छादित व प्रशस्त स्वरूपाची करण्यात येत आहे. राज्यातून संघाचे आगमन शुक्रवारी (दि. २४) होणार आहे. स्पर्धेसाठी येणार्या मुला-मुलींची निवास व्यवस्था मैदानापासून पाच मिनिटांच्या अंतरावरील सर्व सोयीयुक्त कार्यालयांमध्ये करण्यात आली आहे.
चित्तथरारक मल्लखांबाच्या कसरतीचा रंगणार थरार, राज्यातील ६०० खेळाडूंचा सहभाग
यासोबतच खेळाडूंसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहे. मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून मैदानावर दोन्ही वेळचे नाश्ता व भोजनाची सोय करण्यात आली आहे. १२ व १४ वर्षाखालील मुले आणि मुलींचा पुरलेला मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब यांच्या स्पर्धेमध्ये साधारणतः ६०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव अनंत रिसे यांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, उपाध्यक्ष नंदेश शिंदे, उपाध्यक्ष राजाभाऊ अवसक, सचिव अनंत रिसे, सहसचिव मोहिनीराज लहाडे, सहसचिव अजित लोळगे, खजिनदार होनाजी गोडळकर प्रयत्नशील आहेत. स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख अमित जिनसीवाले करत आहेत, तर तांत्रिक बाजू तांत्रिक समितीचे अध्यक्ष नीलेश कुलकर्णी, सतीश दारकुंडे, दिलीप झोळेकर व विष्णू देशमुख व सर्व संघटनेचे सदस्य काम सांभाळत आहेत.